घरमुंबईउल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी - शहरात पूरपरिस्थिती

उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी – शहरात पूरपरिस्थिती

Subscribe

बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीचे पाणी पात्र सोडून शहरातील सखल भागात शिरल्याने शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका नागरिकांना बसला असून, राज्य व रेल्वे मार्ग ठप्प झाले. मुसळधार ते कोसळधार अशी स्थिती बदलापूर शहरात पाहायला मिळत आहे. गेल्या ४८ तासांपासून पडणार्‍या पावसाने ठाणे जिल्ह्यात धुमशान घातले आहे. या सगळ्याचा बदलापूर शहराला चांगलाच फटका बसला आहे.

रात्री उशिरा बदलापूरमधील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे नदीचे पाणी बदलापूर पश्चिमेकडील सखल भागात शिरले. यात चर्च रोड, रमेश वाडी, मानव पार्क, हेंद्रेपाडा, भारत कॉलेज परिसर, शनीनगर, सर्वोदय नगर, चिंतामणी चौक बदलापूर गाव परिसर आणि मुख्य म्हणजे वालिवली परिसरातून वाहणार्‍या उल्हास नदीचे उग्र रूप बदलापूर शहरात पाहायला मिळाले. या संपूर्ण भागात पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. यावेळी वालिवली मधील उल्हास नदीच्या किनार्‍यालागत असणार्‍या मोहन व्हिलोस या रहिवासी संकुलात अडकलेल्या ४ ते ५ जणांना रेस्क्यू टीम बोलावून सुटका करण्यात आली.

- Advertisement -

तसेच, रात्री अचानक ढगफुटी झाल्यासारखा पाऊस कोसळत असल्याने रात्री बदलापूर स्थानकात पाणी भरले. बदलापूर व वांगणी दरम्यान रूळ पाण्याखाली गेल्याने, रात्री १२ वाजता सोलापूरकडे जाणारी सिद्धेश्वर एक्स्प्रेस बदलापूर स्थानकात अडकून पडली. दुपारी १२ च्या सुमारास ही एक्स्प्रेस पुन्हा माघारी मुंबईच्या दिशेने फिरवण्यात आली. लोकल सेवा ठप्प झाल्याने मुंबई व उपनगरात नोकरी निमित्त जाणार्‍या चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले.

पूर ओसरल्यानंतर स्थानिक आमदार किसन कथोरे, तहसीलदार जयराज देशमुख, पालिका प्रशासनाचे अधिकारी यांनी या परिस्थितीचा आढावा घेत, पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्याची सूचना आमदार किसन कथोरे यांनी संबंधित प्रशासनाला केली आहे. बुधवारी कुळगाव-बदलापूर येथे झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे शहरातील विविध प्रभागात पूरस्थिती निर्माण होवून मोठ्या प्रमाणात घरांचे, गाळ्यांचे व मालमत्तेचे नुकसान झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -