उल्हासनगर । उल्हासनगर विधानसभा मतदार संघात मतदान सुरू असताना अचानक पप्पू कलानी यांनी आपल्या समर्थकांसह भाजपा उमेदवार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात धडक दिल्याने दोन्ही गटात बाचाबाची आणि शिवीगाळ झाल्याने तणावचे वातावरण निर्माण झाले. आयलानी गटाने जय श्रीरामचे नारे लावल्याने वातावरण बिघडू नये म्हणून कलानी यांनी तिथून काढता पाय घेतला. मात्र कलानी आणि आयलानी आमने सामने आल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
उल्हासनगर विधानसभा मतदार संघात एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते भाजपाचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे ओमी कलानी अपक्ष उमेदवार भरत गंगोत्री मनसेचे भगवान भालेराव आणि वंचित बहुजन आघाडीचे संजय गुप्ता मुख्य लढतीत होते. मात्र या मतदार संघात निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात ही लढत आयलानी आणि कलानींमध्ये झाली. परंतू प्रचार संपल्यानंतर देखील आयलानी आणि कलानी यांचा ‘प्रचार’ सुरूच होता. पप्पू कलानी यांनी तर स्थानिक यु ट्यूब चॅनलच्या मार्फत मुलाखती देऊन मतदारांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला, याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार असल्याचे समजते. उल्हासनगर विधानसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी २६० मतदान केंद्रात मंडप, बसण्यासाठी खुर्ची आणि पाण्याचीची सोय सुविधा ठेवल्याने मतदारांना कोणताही त्रास जाणवला नाही. तसेच जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी सोय करण्यात आली होती.
धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपावरून मारहाण
मतदाना आदल्या रात्री कॅम्प नंबर तीन मधील रेणुका सोसायटीत माजी नगरसेवक टोनी सिरवानी यांच्या समर्थक समजला जाणारा बाबल्या नावाच्या व्यक्तीला धार्मिक वाद निर्माण करण्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला.
मतदारयाद्यांमध्ये घोळ
निवडणुकीत मतदार याद्याचा घोळ काही ठिकाणी दिसून आला. मतदारांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी उल्हासनगरातील संवेदनशील भागात विशेष लक्ष दिले होते. मतदानापूर्वी शहरातील सराईत गुन्हेगारांना हद्द पार करण्यात होते. मतदान शांततेत पार पडावे यासाठी सर्वत्र चोख बंदोबस्त होता.
दरम्यान आयकरची धाडी तडीपारीच्या कारवाईने कलानी समर्थक कमलेश निकम, संतोष पांडे आणि सुमित चक्रवर्ती यांना या निवडणुक प्रक्रिया पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला.
भाजप उमेदवारांवर पैसे वाटल्याचा आरोप
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कुमार आयलानी यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप मनसे उमेदवार भगवान भालेराव यांनी केला. मनसे उमेदवार भगवान भालेराव हे आपल्या गाडीतून जात असताना भाजप पक्ष कार्यालयाजवळ महिलांची मोठी गर्दी जमलेली दिसली. उत्सुकतेने त्यांनी थांबून निरीक्षण केले असता, कार्यालयातून महिलांना एक कुपन दिले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या कुपनच्या माध्यमातून शेजारच्या एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून महिलांना पैसे वाटले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भगवान भालेराव यांनी त्वरित निवडणूक आयोग आणि पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, भाजप उमेदवारांनी हा आरोप फेटाळून लावत महिलांना केवळ मतदान केंद्राशी संबंधित स्लिप दिल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणामुळे उल्हासनगरच्या राजकीय वातावरणाला उधाण आले आहे. भाजपने मनसेवर खोटे आरोप करण्याचा आरोप केला असून, मनसेने या प्रकरणात अधिक तपासाची मागणी केली आहे. तर भाजप उमेदवार कुमार आयलानी यांनी हा आरोप पूर्णतः निराधार असल्याचे सांगितले. महिलांना आम्ही केवळ त्यांच्या नावाची व मतदान केंद्राची माहिती देत होतो, असे ते म्हणाले.
अंबरनाथमध्ये उत्साहात मतदान
लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावरील नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यातून धडा घेत विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या चुका सुधारत गेले तीन महिने तयारी करत असलेल्या निवडणूक यंत्रणेच्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र मतदानाच्या दिवशी बुधवारी पहायला मिळत होते. तर काही अपवादात्मक मतदान केंद्रांवर तुरळक तक्रारी कायम असल्या तरी मतांचा टक्का वाढवण्यासह वाढीव मतदान केंद्रे, मतदारांसाठी पाणी, बसण्यासाठी खुर्च्या, पंखे आणि सुरक्षा आदी सर्वच व्यवस्थापण पाहून मतदार सुखावले होते. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातील अनेक मतदान केंद्रांवर मतदान केंद्रे उघडण्यापूर्वीच थंड हवेच्या गारव्यात मतदान केंद्राबाहेर उत्साहाने रांगा लगल्याचे चित्र पहायला मिळाले होते. तर लोकसभेच्या तुलनेत वाढीव मतदान केंद्रांमुळे मतदारांना रांगांमध्ये ताटकळत न राहता अगदी कमी वेळेत मतदानाचा हक्क बजावता आला आहे. त्यात यंदा नवमतदारांनीही मोठ्या प्रमाणात उत्साहात मतदान करण्यासाठी केंद्रांवर रांग लावली होती. त्यामुळे या तीनही विधानसभा क्षेत्रात मतदान केंद्रांवर दिवसभर मतदारांचा राबता कायम होता. तर मतदान केंद्रांवर मतदानाचा आढावा घेण्यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांकडून मतदान केंद्रांना भेटी देत मतदारांसोबत संवाद करण्यात येत होता.