उल्हासनगर । बदलापूर अत्याचार प्रकरण, त्यानंतर भिवंडी, अंबरनाथमध्येही लहानग्यांवर अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा उल्हासनगरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. तीन वर्षांच्या मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने या भागात दुःखाचे सावट, संताप व्यक्त केला जात असून खळबळ उडाली आहे. उल्हासनगर कॅम्प ३ येथील ओटी सेक्शन परिसरात राहणारी ही तीन वर्षांची चिमुकली १८ तारखेला बेपत्ता झाली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी उल्हासनगर कॅम्प नंबर ५ हिल लाइन पोलीस ठाण्यामागील खदाणीत या चिमुकलीचा हिचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. लहान मुलीचा मृतदेह आढळून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी नेला आहे. या बाबत शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच पुढील माहिती समोर येईल, असे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. दरम्यान प्रदेश महिला काँग्रेसच्या महासचिव सीमा आहुजा यांनी या संतापजनक घटनेचा तीव्र शब्दात निषेध करताना पीडित चिमुकलीच्या प्रकरणात सखोल चौकशी करुन नराधम आरोपीचा तत्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.