घरमुंबईउल्हासनगरचा स्कायवॉक धोकादायक; बनतोय गुन्हेगारीचा अड्डा

उल्हासनगरचा स्कायवॉक धोकादायक; बनतोय गुन्हेगारीचा अड्डा

Subscribe

उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ असलेला स्कायवॉक हा लोकांच्या सुविधेसाठी बनवण्यात आला होता. मात्र स्कायवॉकवर लूटमार करणाऱ्या टोळ्या, चरसी, मद्यपी, भंगारचोरांनी कब्जा केला आहे.

उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ असलेला स्कायवॉक हा लोकांच्या सुविधेसाठी बनवण्यात आला होता. मात्र स्कायवॉकवर लूटमार करणाऱ्या टोळ्या, चरसी, मद्यपी, भंगारचोरांनी कब्जा केला आहे. स्कायवॉकचे पत्रे, सळया मोठ्या प्रमाणात चोरीला जात असल्याने हा स्कायवॉक धोकादायक झाला आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळील पूर्व आणि पश्चिम जोडणारा स्कायवॉक २०१० साली बनवण्यात आला होता. एमएमआरडीएने ३४ कोटी रुपये खर्च करून हा स्कायवॉक बनवला आहे. मात्र या स्कायवॉकचे मेंटेनन्स, सुरक्षितता कोणी ठेवावी यावरून मनपा, एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनात वाद आहे. स्कायवॉकच्या बाजूला असलेले लोखंडी संरक्षक कठडे, सळ्या, पत्रे, फरशा, दिवे चोरीला जात आहेत. हे सामान चोरी जाण्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की काही दिवसांनी या स्कायवॉकचा केवळ सांगाडा दिसेल, अशी भीती वर्तवण्यात येत आहे. ही चोरी करण्यासाठी भंगारमाफियांच्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या भंगारचोरांना कोणाचेही भय राहिलेले नाही.

सर्वसामान्यांसाठी धोकादायक स्कायवॉक 

दिवसाढवळ्या तरुण – तरुणींचे अश्लील चाळे या ठिकाणी सुरू असतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे वावरणे कठिण झाले आहे. रात्री १० नंतर स्कायवॉकवर ठिकठिकाणी गर्दुल्ले, मद्यपींच्या टोळ्या ठाण मांडून बसलेल्या असतात. या टोळ्या प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करतात. या ठिकाणी ४ जणांच्या टोळीने एका पोलीस कर्मचाऱ्याला काही महिन्यांपूर्वी बेदम मारहाण केली होती. स्कायवॉकचे मेंटेनन्स कोणी ठेवावे यावरून एमएमआरडीए आणि मनपा प्रशासनात वाद आहे. एमएमआरडीएचे म्हणणे आहे की आम्ही स्कायवॉक बांधून मनपा प्रशासनाला हस्तांतरीत केलेले आहे. आता मनपा प्रशासनाने त्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

- Advertisement -

एकमेकांवर जबाबदार ढकलली 

उल्हासनगर मनपा आयुक्त अच्युत हांगे यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की स्कायवॉकची संपूर्ण जबाबदारी ही एमएमआरडीए प्रशासनाची आहे. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. या स्कायवॉकची अवस्था फारच कमी कालावधीत दयनीय झाली आहे. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दादेखील अतिशय गंभीर असून तेथे सुरक्षारक्षक नेमणे अत्यावश्यक असल्याचे मत कल्याण-कर्जत-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -