घरमुंबईविद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना ट्विटरचे वावडे

विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना ट्विटरचे वावडे

Subscribe

केवळ १.४० टक्केच विद्यार्थी मुंबई विद्यापीठाचे फॉलोअर्स ऑफिशियल चिन्ह मिळवण्यात नापास

सध्याचा जमाना हा सोशल नेटवर्किंग साईट्सचा असून त्यात फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपचा सर्वाधिक बोलबाला आहे. त्यातही युवावर्ग आपले मत आणि विचार पटवून देण्यासाठी ट्विटरचा सर्वाधिक वापर करतो, असे मानले जाते. मात्र राज्यभरातील विद्यापीठांमध्ये या प्रभावी माध्यमांचा विसर पडला असून विद्यार्थ्यांनादेखील त्यात फार रुची नसल्याचे दिसून येत आहे.आयआयटी मुंबई वगळता राज्यभरातील विद्यापीठांना ट्विटरवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. मुंबई विद्यापीठाचे उदाहरण द्यायचे झाले तर मुंबई विद्यापीठाचे केवळ १.४० टक्के विद्यार्थी विद्यापीठाला ट्विटरवर फॉलो करीत असल्याचे दिसून आले आहे. सध्या मुंबई विद्यापीठाची विद्यार्थीसंख्या साडे सात लाखांच्या घरात असताना ट्विटरवर असणारे फॉलोअर्स फक्त १० हजारांच्या घरात आहेत.

पुणे विद्यापीठातील फॉलोअर्सची संख्या ही फक्त ५०४ असल्याचे दिसून आले आहे. कमी फॉलोअर्समुळे ट्विट करुन देण्यात येणारे ऑफिशल ट्विटरच्या खात्याचे चिन्ह मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. मुंबईसह जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूब यासारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रामुख्याने यात युवावर्गाची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने शैक्षणिक संस्थांदेखील अदान प्रदानासाठी ट्टिवरचे खाते उघडून त्याचा वापर करत आहेत. ज्यात मुंबईसह राज्यातील अनेक विद्यापीठांचा समावेश आहे. अनेक कॉलेजांनीदेखील त्यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी ट्विटरचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. पण राज्यातील विद्यापीठांनी सुरू केलेला हा प्रयोग फसल्याचे दिसत आहे. ट्विटरच्या माहितीनुसार राज्यभरातील विद्यापीठांच्या फॉलोअर्स विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. आयआयटी मुंबई वगळता इतर कोणत्याही विद्यापीठ आणि कॉलेजांना ट्विटरवर फॉलोअर्स नाहीत. मुंबई विद्यापीठाची एकूण विद्यार्थी संख्या लक्षात घेता केवळ १० हजार ५०० विद्यार्थी ट्विटरवर फॉलो करीत असल्याचे दिसून आले आहे. मुंबई विद्यापीठाने मे २०१५ पासून आपले ट्विटर खाते सुरू केले आहे. तीन वर्षात विद्यापीठाने हे फॉलोअर्स मिळविले असून फक्त ६१३ वेळा ट्विट केले असल्याची माहिती समोर आली आहे. तर पुणे विद्यापीठात हे प्रमाण त्याहून कमी असल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

जुलै २०१५ पासून पुणे विद्यापीठाचे ट्विटरवर आगमन झाले. आतापर्यंत त्यांना फक्त ५०४ फोलोअर्स मिळविण्यात यश आले आहे. तर त्यांनी केलेल्या ट्विटची संख्या ही फक्त २८ इतकी आहे. तर पुणे विद्यापीठाकडून फॉलो करण्यात येणार्‍यांची संख्या फक्त ८ वरच मर्यादित राहिली आहे. तर नागपूर विद्यापीठाची स्थिती यावरुन खराब असल्याचे दिसून आले आहे. नागपूर विद्यापीठास आतापर्यंत २०४ फोलाअर्स मिळविण्यात यश आले आहे. नागपूर विद्यापीठाने २०१० पासून आतापर्यंत फक्त २०४ फोलोअर्स जमविले आहेत. एकीकडे राज्यातील पारंपरिक विद्यापीठांना ट्विटरवर म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसताना आयआयटी सारख्या नामांकित संस्थाना मात्र मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स मिळत आहेत. आयआयटी मुंबईला जवळपास ४९ हजार १०० फॉलोअर्स असल्याची माहिती समोर आली असून त्यांनी २००९ पासून आतापर्यंत ६७० वेळा ट्विट केले आहे. पण ते फॉलो करीत असलेल्यांची संख्या मात्र कमी असून ती ९५ वरच मर्यादित असल्याची माहिती समोर आली आहे.

परदेशी विद्यापीठे सरस

एकीकडे राज्यातील विद्यापीठांना ट्विटरवर फॉलोअर्स मिळत नसल्याचे दिसून आले, तरी परदेशी विद्यापीठांना मात्र प्रचंड प्रमाणात फॉलोअर्स मिळताना दिसत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने २००९ पासून ट्विटरवर सुरुवात केली आहे. त्यांचे आतापर्यंत ४ लाख ७९ हजार फॉलोअर्स नोंदविले गेले आहेत. तर ऑक्सफर्डने केलेल्या ट्विटची संख्या देखील १४ हजारांच्या घरात असल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

विविध खात्यांमुळे फटका

राज्यातील विद्यापीठांना मिळत असलेला अत्यल्प प्रतिसादाचे प्रमुख कारण म्हणजे अधिकृत खाते नसल्याने विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आज मुंबई विद्यापीठाची एक नव्हे तर दोन ते तीन ट्विटर खाती असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळेच चुकीची माहिती मिळू नये म्हणून विद्यार्थी खात्यांना फॉलो करीत नसल्याची माहिती समोर आली आहे.

सातत्य नसल्याने नाराजी

विद्यार्थी आणि विद्यापीठ प्रशासनामध्ये सुसंवाद असावा म्हणून साधारणपणे ट्विटरला प्राधान्य दिले जाते. पण राज्यभरातील विद्यापीठ ट्विट करताना सातत्य ठेवत नसल्याने विद्यार्थी कमी प्रमाणात फॉलो करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

विद्यापीठ – फॉलोअर्सची संख्या

ऑक्सफर्ड विद्यापीठ – ४ लाख ७९ हजार
आयआयटी मुंबई -४९ हजार १४५
मुंबई विद्यापीठ -१०,४६५
पुणे विद्यापीठ -५०४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -