मुंबईत सुरू होणार उत्तरप्रदेश सरकारचे कार्यालय, मुख्यमंत्री योगींची घोषणा

Uttar Pradesh Government Office to be opened in Mumbai, announced by Chief Minister Yogi
Uttar Pradesh Government Office to be opened in Mumbai, announced by Chief Minister Yogi

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना काळात राज्यामध्ये स्थलांतरित नागरिकांना सामाजिक-आर्थिक सुरक्षा देण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत मुंबईत राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील स्थलांतरित नागरिकांसाठी कार्यालय सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक सुरक्षा सुनिश्चित केली जाईल, मुळ राज्यात गुंतवणूक, रोजगार, पर्यटन आदींसाठी समन्वय साधला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या क्षेत्रात करतात काम –

मुंबईत उद्योग, सेवा क्षेत्र, किरकोळ व्यापार, वाहतूक, खाद्य व्यवसाय, कारखाना किंवा गिरणी इत्यादींमध्ये मोठ्या संख्येत उत्तर भारतीय नागरिक काम करतात. या शिवाय माहिती तंत्रज्ञान, चित्रपट, दूरदर्शन, उत्पादन, अन्न प्रक्रिया इत्यादी उद्योगांशी हे लोक संबंधित आहेत. असंघटित क्षेत्रात उत्तर प्रदेशातील कामगारही मोठ्या संख्येने मुंबईत काम करत आहेत.

गेल्या दोन वर्षांत कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने परप्रांतियांना मूळगावी परतावे लागले होते. यावेळी योगी सरकारने स्थलांतरितांना मदत केली होती. स्थलांतरित नागरिकांना उत्तर प्रदेशातील पर्यटन, संस्कृती आणि इतर क्षेत्रातील गुंतवणुकीच्या शक्यतांची जाणीव करुन देणे आणि त्यांना तिथे उद्योग सुरु करण्यास प्रवृत्त करणे हा मुंबईत कार्यालय सुरु करण्यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही मिळणार मदत –

हे कार्यालय लवकरच सुरु होणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील जे नागरिक नोकरी, व्यवसायासाठी मुंबईत दीर्घकाळ वास्तव्य करत आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला जाणार आहे. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांच्यासाठी मुंबईत अनुकूल आणि आकर्षक औद्योगिक वातावरण निर्माण केले जाईल. यूपीमध्ये त्यांच्या उत्पादनांना किंवा सेवांसाठी खूप मोठी बाजारपेठ आणि मागणी आहे, त्यामुळे तिथे गुंतवणूक करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल, असे त्यांना सांगितले जाणार असल्याचे सूत्रांनी सागितले