घरमुंबईमुंबईत लसीचा तुटवडा; तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा

मुंबईत लसीचा तुटवडा; तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा

Subscribe

मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ जानेवारीपासून कोरोनावरील लसीचे डोस देण्यास सुरुवात केली. कालपर्यंत १४ लाख ११ हजार ३२८ नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. मात्र आता मुंबईत केवळ १ लाख ८५ हजार लसींचा साठा शिल्लक असून हा साठा पुढील ३ दिवस पुरेल इतकाच आहे, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी मुंबईला पुढील तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक असल्याची कबुली दिली आहे. तसेच, आम्ही केंद्र सरकारकडे लसीचा अधिक पुरवठा करण्याबाबत अगोदरच मागणी केली असल्याचे व त्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईला पुढील लसीचा साठा १५ एप्रिलपर्यंत उपल्बध होणार आहे. तोपर्यंत मुंबईत लसीचा तुटवडा निर्माण होणार आहे.लसींच्या तुटवड्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकारला जबाबदार ठरवले आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, केंद्राने आतापर्यंत लसीचा साठा पुरवूनही महापौर उगाच केंद्राला दोष देऊन राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे.

त्यामुळे आता लसीच्या तुटवड्यावरून मुंबईत शिवसेना व भाजप यांच्यात घाणेरड्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे लस कधी मिळणार याकडे मुंबईकर डोळे लावून बसले आहेत.

- Advertisement -

प्राप्त माहितीनुसार, मुंबईत सध्या १ लाख ८५ हजार इतक्या लसीचा साठा शिल्लक आहे. यामध्ये, कोव्हीशिल्ड लसीचे १ लाख ७६ हजार ५४० डोस शिल्लक आहेत. तर भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिन लसीचे ८ हजार ८४० डोस शिल्लक आहेत. हा लसींचा साठा पुढील तीन दिवस पुरेल इतकाच आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडे लसीचा जादा साठा लवकरात लवकर पुरविण्यासाठी मागणी केली होती. मात्र अद्यापपर्यंत लसीचा साठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना लसीबाबत चिंता लागून राहणार आहे.

आतापर्यंत लसीचे १४.११ लाख डोस वितरित

१६ जानेवारीपासून मुंबईत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. ५ एप्रिलपर्यंत पालिका, सरकारी व खासगी रुग्णालयात कोव्हीशिल्ड व कोवॅक्सिन या लसींचे १४ लाख ११ हजार ३२८ डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. यामध्ये, हेल्थ वर्करला २ लाख ५३ हजार ८९२ डोस, फ्रंट लाईन वर्करला २ लाख ६६ हजार ८६ डोस, ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना ६ लाख ८ हजार ४७४ डोस , ४६ ते ५९ वयोगटातील नागरिकांना २ लाख ८२ हजार ८७६ डोस, असे दोन्ही लसींचे एकूण १४ लाख ११ हजार ३२८ डोस देण्यात आले आहेत.

यामध्ये, कोव्हीशिल्ड लसीचे १३ लाख १८ हजार ५६५ डोस तर कोवॅक्सिन लसीचे ९२ हजार ७६३ डोस देण्यात आले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -