वसईत महिला स्पेशल लोकलवरून जुंपला श्रेयवाद

खासदार राजेंद्र गावित यांची चमकोगिरी

वसईपासून महिला स्पेशल लोकल अचानक बंद केल्याने या ठिकाणी महिलांमध्ये प्रचंड नाराजी होती. या प्रकरणी महिलांच्या मागणीनुसार बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर आणि वसईच्या महिलांनी महिला विशेष लोकल पुन्हा सुरु व्हावी यासाठी पाठपुरवठा केला. महिला प्रवाशांच्या अथक परिश्रमानंतर ही लोकल २५ डिसेंबरपासून पुन्हा सुरु झाली. मात्र यावरून आता बहुजन विकास आघाडी आणि भाजप यांच्यात श्रेय लाटण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. मंगळवारी भाजपचे खासदार राजेंद्र गावित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकांवर जल्लोष करत महिला विशेष लोकलवर आपले बॅनर लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिला प्रवाशांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने 1 नोव्हेंबरपासून लोकल गाड्यांचे नवे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार वसईपासून सुटणारी महिला स्पेशल लोकल रद्द करून ती विरारपासून सुरु केली. त्यामुळे विरारच्या महिलांना या स्पेशल लोकलचा फायदा झाला, मात्र पश्चिम रेल्वेच्या निर्णयामुळे वसईच्या महिलांची गैरसोय झाली होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त करत केली. वसई महिला स्पेशल लोकल पुन्हा सुरु करण्याची मागणी पश्चिम रेल्वेला करण्यात आली होती. मात्र रेल्वे याकडे लक्ष देत नव्हती. त्यानंतर या महिलांनी आमदार क्षितिज ठाकूर यांच्याकडे धाव घेतली.

महिला प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन आमदार क्षितिज ठाकूर यांनी पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आणि रेल्वे मंत्री यांच्यासोबत पत्रव्यवहार केला. याविषयीचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’मध्येही प्रकाशित झाले. त्यामुळे पश्चिम रेल्वेने महिला प्रवाशांच्या समस्येची दखल घेत लवकरच ही लोकल सुरू करू, असे आश्वासन दिले होते. आज ते आश्वासन पूर्ण झाले. मंगळवारपासून वसई महिला विशेष लोकल सुरु झाली, मात्र या लोकलवर भारतीय जनता पक्षाचे खासदार यांनी वसई महिला विशेष लोकल सुरु करण्यासाठी परिश्रम घेणार्‍यांना बाजूला सारत स्वत:च्या नावाने पोस्टरबाजी करत स्वतः श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या वसई महिला विशेष लोकल प्रकरणी मेाठ्या प्रमाणात राजकीय टिकाटिप्पणी सुरू झाली आहे.

लोकल फास्ट वरून स्लॉ झाल्याने नाराजी
ही महिला विशेष लोकल पूर्वी जलद होती, मात्र आता ती धीम्या गतीची केली आहे. पूर्वी वसई रेल्वे स्थानकावरून सकाळी ९.५६ वाजता सुटायची आणि चर्चगेटला ११.१० वाजता पोहचायची. मात्र आज ही लोकल स्लॉ झाल्याने वसई स्थानकावरून सकाळी १०.०४ वाजता सुटते, तर सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी चर्चगेटला पोहचते. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये पश्चिम रेल्वेचे या निर्णया विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. ही लोकल पुन्हा जलद करण्याची मागणी महिला प्रवाशांनी केली आहे.

वसई महिला विशेष लोकल पुन्हा सुरु करण्यासाठी वसईच्या महिला प्रवाशांनी अथक परिश्रम घेतले. त्या पाठोपाठ आमदार क्षितिज ठाकूर यांनीसुद्धा रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि रेल्वे प्रशासन यांच्याकडे पत्रव्यवहार करून महिला विशेष लोकल सुरु करण्याची मागणी केली होती. आज ही महिला विशेष लोकल सुरु झाली आहे. मात्र भाजपचे खासदार राजेंद्र गावित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकांवर जल्लोष करत श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रकार हा लजास्पद आहे.
– अ‍ॅड. मृदुला खेडेकर, वसई येथील लोकल प्रवाशी

आम्ही जनतेची कामे करण्याला अधिक महत्त्व देतो, मात्र काही लोकांना श्रेय घेण्यात महत्व वाटते. त्यांच्यासाठी बॅनर लावावे लागते. मात्र जनतेला ठाऊक आहे की, कामे कोण करते आणि श्रेय कोण लाटते?
– क्षितिज ठाकूर, आमदार, वसई