दसऱ्याच्या दिवशीही राणीची बाग व संग्रहालय पर्यटकांसाठी खुले

veer jijamata udyan ranichi baug and museum are open for tourists on Dussehra 2022

मुंबई -: बुधवार ५ ऑक्टोबर रोजी ‘विजयादशमी’ म्हणजेच ‘दसरा’ सण मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात येतो. याच दसऱ्यानिमित्त शिवाजी पार्कवर मेळावा आयोजित करण्यावरून शिवसेनेतील शिंदे व ठाकरे गटातील संघर्षाला उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने पूर्णविराम मिळाला. ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी मिळाली. मात्र याच बुधवारी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी भायखळा येथील राणी बाग साप्ताहिक सुट्टी असल्याने बंद न ठेवता पर्यटकांसाठी खुली ठेवण्याचा निर्णय राणी बाग प्रशासनाने घेतला आहे.

दसऱ्याच्या सणानिमित्ताने राणी बागेतील पर्यावरणाचा आनंद हजारो पर्यटकांना घेता यावा, यासाठी राणी बाग प्रशासनाने सुट्टीच्या दिवशीही राणीची बाग खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्राणी संग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी, दिलेल्या माहितीनुसार, साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी राणी बागेत स्वच्छता मोहीम राबवली जाते. प्राण्यांच्या पिंजर्यांची स्वच्छता करण्यात येते. प्राण्यांना काहीशी विश्रांती देण्यात येते. जागतिक नियमानुसार प्राणी संग्रहालय व उद्यान हे आठवड्यातून एक दिवस बंद ठेवणे बंधनकारक असते. मात्र जेव्हा सण, उत्सव यानिमित्ताने उद्यान व प्राणी संग्रहालय हे सुट्टीच्या दिवशी खुले ठेवले जाते, त्याच्या दुसऱ्या दिवशी प्राणी संग्रहालय हे बंद ठेवण्यात येते. म्हणहेच ५ ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी राणीची बाग पर्यटकांसाठी खुली असणार आहे. तर ६ ऑक्टोबर रोजी राणी बाग बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका प्रशासन मुंबईकरांना पाणी, रस्ते, उद्याने, शिक्षण, मंडई आदी विविध प्रकारच्या सेवासुविधा देत असते. तसेच, राणी बाग, प्राणी संग्रहालय यासारकाखी विरंगुळ्याची ठिकाणेही उपलब्ध करुन देत असते. राणीच्या बागेत दररोज हजारो लोक पेंग्विन, साप, वाघ, माकडे, पक्षी आदी बघण्यासाठी येत असतात. मात्र राणीच्या बागेत पेंग्विन आणल्यापासून राणी बागेतील गर्दीत वाढ होऊ लागली आहे. तसेच, शनिवार व रविवारी साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या गर्दीत आणखीन वाढ होते.


अशोक चव्हाणांनी केलेल्या गौप्यस्फोटात तथ्य असणं स्वाभाविक; जयंत पाटलांचा भाजपला टोला