मंडई झाल्या खुल्या; पण हॉकर्स प्लाझा मात्र बंद

मुंबई महापालिकेने एकाबाजुला मंडई पुन्हा सुरु केल्या असल्या तरी दादरमधील हॉकर्स प्लाझाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Vegetable markets are open but hawkers plaza still remains closed
मंडई झाल्या खुल्या; पण हॉकर्स प्लाझा मात्र बंद

मुंबई महापालिकेने एकाबाजुला मंडई पुन्हा सुरु केल्या असल्या तरी दादरमधील हॉकर्स प्लाझाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मागील तीन महिन्यांपासून हॉकर्स प्लाझामधील व्यावसायिकांचे हाल होत असून जर महापालिकेच्या मंड्या पुन्हा सुरु होत असतील तर मग हॉकर्स प्लाझाला वेगळा न्याय का? असा सवाल हॉकर्स प्लाझामधील गाळेधारकांनी केला आहे. इतर वेळी हॉकर्स प्लाझाकडे मंडई म्हणून पाहायचे आणि कोरेानाच्या काळात या प्लाझाचा समावेश मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये केला जातो. त्यामुळे प्रशासनाच्या निर्णयामुळे येथील कपड्यांच्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून आम्ही जगायचे कसे असा सवाल त्यांनी केला आहे.

कपड्यांसह इतर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

दादरमधील फेरीवाल्यांसाठी बांधलेल्या हॉकर्स प्लाझा हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉक-डाऊनमुळे बंद करण्यात आले. त्यानंतर हे हॉकर्स प्लाझा अद्यापही बंदच आहेत. परंतु, आजुबाजुची सर्व दुकाने तसेच मंडईंमधील सर्व दुकानांना उघडण्यास परवानगी दिली असली तरी हॉकर्स प्लाझाला उघडण्यास महापालिकेने परवानगी दिली नाही. पाच मजली इमारतीतील या हॉकर्स प्लाझातील दोन मजले हेच वापरात आहेत. येथील सर्व गाळेधारकांनी कोरेानाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून तसेच सोशल डिस्टन्सिंग राखून व्यावसाय करण्यास तयार असल्याचे गाळेधारकांच्या शिष्टमंडळांनी तयारी दर्शवली आहे. तरीही महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक हॉकर्स प्लाझा खुले करत नसल्याचा आरोप भाजप नगरसेविका शीतल गंभीर-देसाई यांनी केला आहे.

जर वांद्र्यात कपड्याच्या व्यवसाय सुरु होतो,तर मग दादरच्या या हॉकर्स प्लाझामध्ये आणि जी महापालिकेचीच वास्तू आहे, त्यात ही परवानगी का दिली जात नाही, असा सवाल शीतल गंभीर-देसाई यांनी केला आहे. ही मंडई बंद असल्याने गाळेधारकांना व्यवसाय करता येत नाही. परिणामी हाती चार पैसे नाहीत. त्यातच आता हक्काचे ग्राहक दुसरीकडे जात आहेत. मग या व्यवसायिकांनी काय उपासी मरायचे का असाही सवाल त्यांनी केला. त्यामुळे याबाबत आपण महापालिका आयुक्त इक्बाल सिंह आणि बाजार विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांना निवेदन देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दादरमधील घाऊकसह किरकोळी भाजी विक्री करण्यास बंदी घालण्यात आल्याने हे भाजी विक्रेते आता माटुंगा, माहिमच्या दिशेने सुरकू लागले आहे. सेनापती बापट मार्गावरील दादरमधील हे फेरीवाले आता याच मार्गावर माटुंगा आणि माहिम पश्चिम येथील पथारी पसरवून बसू लागले आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांकडे भाजी खरेदीसाठी गर्दी होत असून या वाढत्या फेरीवाल्यांमुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नगरसेविका शीतल गंभीर-देसाई यांनी महापालिकेच्या जी-उत्तर विभागासह स्थानिक पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी दादरमधील तसेच टि.एच. कटारिया मार्गावरील फेरीवाले तसेच काही कुटुंबे रस्त्यांवर झोपडी बांधून राहिले आहे. त्यामुळे एरव्ही मोकळा असणारा हा रस्ता आता फेरीवाल्यांनी गजबजू लागला असून भाजीचा व्यवसाय करताना कुठेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे यासर्वांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


हेही वाचा – मुंबईत समूह संसर्ग ओळखण्यासाठी आता ‘सेरो सर्वेक्षण’