मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. (Veteran actress Seema Dev passed away) वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. ज्यानंतर त्यांची आज (ता. 24 ऑगस्ट) प्राणज्योत मालवली. मागील वर्षी 2 फेब्रुवारी 2022 ला त्यांचे पती आणि मराठीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले होते. वांद्र्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव आणि त्यानंतर आता सीमा देव यांच्या निधनाने मराठी सृष्टीतील एव्हर ग्रीन जोडी कायमची काळाच्या पडद्याआड गेली आहे, असे म्हणावे लागेल.
मागील तीन वर्ष सीमा देव या अल्झायमर (स्मृतीभंश) या आजाराने पीडित होत्या. घरातच त्यांचे कुटुंबीय यांची काळजी घेत होते. आज सकाळी झोपेतच त्यांची प्राणज्योत माळवली अशी माहिती त्यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी महानगर बरोबर बोलताना दिली. सीमा देव यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची विशेष जोडी जमली ती रमेश देव यांच्याबरोबर. पुढे त्यांनी रमेश देव यांच्याबरोबर संसार देखील थाटला. ही देव जोडी एकत्र पाहणे म्हणजे चित्रपट प्रेमींना एक पर्वणीच असायची. सीमा देव यांच्या मागे अभिनव आणि अजिंक्य ही दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. रमेश देव यांना जाऊन जेथे दीड वर्ष देखील झाले नाही. तेथे सीमा देव यांच्या जाण्याने देव कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 4.30 वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सीमा देव यांचे मूळ नाव नलिनी सराफ होते. परंतु, चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांचे नाव सीमा ठेवण्यात आले. 1957 मध्ये त्यांनी ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर फक्त मराठी सिनेमांमध्येच काम न करता त्यांनी हिंदीमध्ये देखील काम करण्यास सुरुवात केली. मराठीमधील त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. परंतु ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर, जशी चवथीच्या चंद्राची कोर’ या त्यांच्या गाण्याला सिनेरसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आजही त्यांचे हे गाणे प्रेक्षकांचे आवडते आहे. सीमा देव यांचे ‘आनंद’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले.