घरमुंबईहे महाराजा विक्रोळी डंपिंगमुक्त होऊ दे रे!!

हे महाराजा विक्रोळी डंपिंगमुक्त होऊ दे रे!!

Subscribe

दुर्गंधी सहन करणारे नागरिक बाप्पाला घालणार साकडे, नाक बंद करून घेतले जातंय दर्शन; कांजूर डम्पिंग ग्राउंडमधून असह्य दुर्गंधीचा परिणाम

मुंबई : हे देवा महाराजा, विक्रोळी परिसर डंपिंगमुक्त होऊ दे…येथील नागरिकांना सुदृढ आरोग्य लाभू दे…पालिकेची अवकृपा दूर जाऊ दे…असे गार्‍हाणे विक्रोळीतील गणेशोत्सव मंडळ बाप्पाला घालणार आहेत. याला कारणही तसेच आहे. ऐन गणेशोत्सवात पालिकेच्या कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमधून असह्य होणारी दुर्गंधी सुटली आहे. यामुळे कांजूरमार्ग, विक्रोळी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतीचे दर्शनही नाकावर हात ठेवून घेतले जात आहे.

गणेशोत्सव काळात सुटलेल्या या दुर्गंधीमुळे दारं-खिडक्या बंद करून सण साजरा करावा लागत आहे. तीन दिवसांपासून डम्पिंग ग्राऊंडमडून दुर्गंधी सुटली आहे. यामुळे त्वचेचे आजार, दमा रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. पालिकेमुळे उदभवलेल्या या त्रासामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.

- Advertisement -

दुर्गंधीची तक्रार करण्यासाठी पालिकेच्या 1916 या आपत्कालीन सेवेवर संपर्क साधला असता आम्ही समस्या सोडवू, फवारणी सुरू आहे, असे सांगण्यात येत आहे. परंतू अजूनही दुर्गंधी कमी झाली नसल्याची परिस्थिती आहे.
रात्रीच्या वेळी डम्पिंगमधून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे

कांजूरमार्ग, विक्रोळी या भागातील नागरिकांना स्वतःच्या विभागातील गणपती पाहणे मुश्कील होऊन बसले आहे. कन्नमवार, टागोर नगर भागात वृद्ध नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. 2017 साली उत्सवाच्या काळात दुर्गंधी सुटली होती. पालिकेने तोच प्रकार पुन्हा केला आहे.

- Advertisement -

अनेक तक्रारी केल्या आहेत. जर दुर्गंधी कमी झाली नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल. दरवर्षी सणांच्या काळात असे का होते याचा शोध घेणार आहोत, असे मनसेचे शाखाध्यक्ष जयंत दांडेकर म्हणाले.

डम्पिंग ग्राउंड मधून सुटलेल्या दुर्गंधीमुळे त्रास होत आहे. मंडपात मोठ्या प्रमाणावर अगरबत्ती पेटवून दुर्गंधी कमी करण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. गणेश भक्तांना रुमाल नाकावर घेऊन दर्शन घ्यावे लागत आहे, असे सार्वजनिक उत्सव समिती, गणेश मैदान अध्यक्ष सुभाष गोठणकर यांनी सांगितले.

डम्पिंग ग्राउंडमधून येणार्‍या दुर्गंधीमुळे श्वसनाचे आणि त्वचेचे आजार घेऊन येणारे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांचा यात मोठ्या प्रमाणावर समावेश आहे, असे विक्रोळीतील प्रसिद्ध डॉक्टर हरीश पांचाळ यांनी सांगितले.

दुर्गंधी जावी याबाबत पाठपुरावा सुरू आहे, पालिका प्रशासनाने योग्य कार्यवाही न केल्यास आंदोलन करू, असा इशारा नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी दिला. आजारी पिढी या ग्राऊंडमुळे निर्माण होत आहे, तेव्हा हे ग्राऊंडच येथून हटवावे, अशी मागणी काँग्रेसचे राहुल वाघधरे, भारिपचे विजय चंद्रमोरे, भूषण भिसे यांनी केली.

डम्पिंगविरोधात आमची न्यायालयीन लढाई सुरू आहे. असह्य दुर्गंधी येत आहे. फवारणी योग्य प्रकारे होत नाही. पर्यावरणाचे रक्षण करणार्‍या खारफुटीला धोका निर्माण झाला आहे, असे याचिकाकर्ते संजय येलवे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -