…म्हणून आशिष शेलारांकडे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली, विनोद तावडेंनी सांगितलं ‘कारण’

vinod tawade

येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत. या निवडणुका भाजपच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आशिष शेलारांसारखा अनुभवी कार्यकर्ता ज्याने ३५ वरून ८२ नगरसेवक त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडून आले होते. अशा कार्यकर्त्यांची निवड होणं याला वेगळं महत्त्वं आहे. आशिष शेलार आणि त्यांच्या टीमवर केंद्राने दाखवलेल्या विश्वासावर ते खरे उतरतील, असं विनोद तावडे म्हणाले. विनोद तावडे यांनाही भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी निवड झाली आहे.

विनोद तावडे यांनी भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांचं अभिनंदन केलं.तसंच, त्यांनी केंद्र सरकारच्या हरघर योजनेसंदर्भातही माहिती दिली.

ते म्हणाले की,”भाजपाने देशभरात हर घर तिरंगा एक मोठं अभियान राबवलं आहे. काश्मीरच्या घंटाघरच्या लाल चौक पूर्ण तिरंग्याने सजलं आहे. दल लेकमध्ये तिरंगा यात्रा निघाली. भारताच्या सर्व प्रदेशामध्ये असा उत्स्फूर्त प्रतिसाद हरघर तिरंगा अभियानामध्ये लोकं देत आहेत. स्वातंत्र्यांचे ७५ वं वर्ष आहे, पंतप्रधानांनी घोषित केल्यानुसार पुढील २५ वर्षे अमृत काळ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या २५ वर्षांत कोणकोणत्या क्षेत्रात कुठे कुठे झेप घ्यायची आहे, याचं नियोजन केंद्राने केलं आहे. त्यादृष्टीने पावलं टाकणं सुरू आहे. पुढच्या २५ वर्षांत, २०४७ मध्ये भारत प्रत्येक क्षेत्रात कसा असेल, कसा असला पाहिजे, जगात श्रेष्ठ भारत ठरला पाहिजे या हर घर तिरंग्यातून ठरवलं आहे, असंही तावडे म्हणाले.