घरमुंबईराज ठाकरे यांच्या 'टुरिंग टॉकीज'ला शरद पवारांकडून स्क्रिप्ट

राज ठाकरे यांच्या ‘टुरिंग टॉकीज’ला शरद पवारांकडून स्क्रिप्ट

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथून परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या बालाजी हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या ‘टुरिंग टॉकिज’ची पुढची स्क्रिप्ट शरद पवार यांनी त्यांना दिली असावी, असा गौप्यस्फोट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत केला. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विनोद तावडे बोलत होते.

ठाकरेंचे टूरिंग टॉकिजचे शो सुरु

महाराष्ट्रात राज ठाकरे यांचे टूरिंग टॉकिजचे शो सध्या सुरु आहेत. काल सोलापूरला शो झाला व काही शो राज्यात इतरत्र होणार असल्याचे सांगतानाच तावडे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खर्च भाजपने निवडणूक आयोगाकडे मागितला नव्हता, तर राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खात्यात दाखविणार एवढीच मागणी आपण निवडणूक आयोगाला केली होती. भाजपाने राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च मागितला असा समज मनसेचा झाल्यामुळे राज ठाकरे यांनी काल सोलापूरच्या सभेत मोदीं यांच्या सभांचा खर्च मागितला असावा. पण नरेद्र मोदी हे हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचाराचा खर्च हा निवडणूक आयोगाला पक्षाच्या खर्चातून नियमितपणे सादर होत असतो. मनसे बहुधा निवडणूक लढवत नसल्यामुळे हे त्यांच्या लक्षात आले नसेल. राज ठाकरे कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत हे मनसेने जाहीर करावे, असे आवाहनही तावडे यांनी यावेळी केले.

- Advertisement -

तावडेंचा राहुल गांधीवर टोला 

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल नांदेडमध्ये बोलताना राफेलचा पुन्हा मुद्दा उपस्थित केला. पण सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना जी चपराक लगावली आहे आणि नोटीस दिली आहे, त्याचे उत्तर त्यांनी अद्याप दिलेले नाही. यासंदर्भात जर राहूल गांधीनी खुलासा केला असता, त्यांचे म्हणणे जनतेला कळले असते, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी, शेकाप, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रिपाई (गवई) या पक्षांच्या महाआघाडी तर्फे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर एक जाहिरात प्रसारित केली आहे. त्या जाहिरातीत एका शेतकऱ्याची पत्नी आपल्या शासनाने दहा रुपयांचा चेक पाठवला, असे म्हणते. शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी या महाआघाडीत असतानासुध्दा शेतकऱ्यांना सरकारकडून पैसे चेकने गेले की आरटीजीएस ने गेले हेही यांना माहित नाही. बहुधा हे बांधावरचे शेतकरी दिसत आहेत, प्रत्यक्ष शेतात राबणारे शेतकरी नाहीत, अशी टिप्पणीही तावडे यांनी केली.

राजकीय हेतूसाठी अपप्रचार होतोय

सरकारी शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत दहा रुपयाचा चेक पाठविला आहे, असे जाहीरातीतील महिला म्हणते. पण असे दहा रुपये कुणालाच पाठवले गेले नसून त्याहून अधिक रकमा त्या त्या खात्यात पाठवल्या गेल्या आहेत, असे स्पष्ट करतानाच तावडे म्हणाले की, अशा प्रकारची खोटा व जनतेची दिशाभूल करणारा तसेच शेतकऱ्यांमध्ये राजकीय हेतूसाठी असंतोष निर्माण करणारा अपप्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे या धादांत खोट्या जाहिरातीबाबत आम्ही निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे की, या चुकीच्या आणि खोट्या जाहिरातीबाबत निवडणूक आयोगाने या सर्व पक्षांवर कार्यवाही करावी आणि आदर्श आचारसंहीतेच्या उल्लंघनाबाबत कार्यवाही करावी, अशी मागणीही तावडे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -