Video: गाजर ज्यूस पित असाल तर सावधान!

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांच्या जिवाशी अजून किती खेळणार, असा प्रश्न सामान्य विचारत आहे.

फिटनेस करताना आपण गाजराचा ज्यूस, बिटाच्या जूसचं महत्त्व असतं. पण, आता गाजराचा ज्यूस पिताना थोडं सावधान… कारण, गाजर कोणत्या पाण्यातून आणि कशापद्धतीने धुतले जातो याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही पुन्हा गाजराचा ज्यूस प्यावा का? हा विचार नक्कीच कराल.

हा आहे व्हायरल होणारा व्हिडिओ

अनेकदा प्रवासादरम्यान रस्त्यात थांबून आपण थंडपेय पितो किंवा वेगवेगळे ज्युसही पितो. रस्त्यावर तयार होणारे हे ज्युस कसे तयार होत असतात? याची आपल्याला कल्पनाही नसते. तसेच यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ कुठून आणि कसे आणले जातात, आपण घरात आणत असलेल्या भाज्याही कशाप्रकारे आपल्यापर्यंत पोहोचत असतात. याची माहिती आपल्याला नसते. असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दादरमध्ये असलेल्या प्लाझा मार्केटमधील असल्याचे सांगितले जात आहे.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ड्रममध्ये असलेले गाजर पायाने धुवत असल्याचे दिसत आहे. तसेच दुसरी एक व्यक्ती व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीशी अरेरावी करतानाही दिसत आहे. यामध्ये व्हिडिओ तयार करणारी व्यक्ती समोरील व्यक्तीला गाजर हाताने धुण्यास सांगत आहे. त्यावर आपण किती गाजर हाताने धुवायची. तुम्ही माती लागलेले गाजर खाणार का? असा उलटा सवाल समोरील व्यक्ती विचारताना दिसत आहे.

नागरिकांच्या जिवाशी खेळ

दरम्यान, या व्हिडिओवर आता संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या असल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. यापूर्वी, कुर्ला रेल्वे स्थानकावरही असा प्रकार समोर आला होता. रेल्वे स्थानकावर असलेल्या स्टॉलमधील एक व्यक्ती लिंबू सरबतासाठी तयार केलेल्या पाण्यातच हात धुत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर रेल्वेने त्याच्यावर कारवाई केली होती, असे प्रकार सर्रास होत असल्याने नागरिकांच्या जिवाशी अजून किती खेळणार असा प्रश्न सामान्य विचारत आहेत.

” या व्हिडीओबाबत चौकशी करण्यासाठी एफडीएचे काही अधिकारी गेले आहेत. जर कोणी दोषी आढळले तर नक्कीच कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे सह-आयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी सांगितलं आहे.”