घरमुंबईविरारमध्ये प्रयत्न करूनही मुलगी वाचवू शकली नाही पित्याला

विरारमध्ये प्रयत्न करूनही मुलगी वाचवू शकली नाही पित्याला

Subscribe

विरारमधील नरोत्तम बारिया यांची तब्येत अचानक बिघडली. इमारतीबाहेर पाणी तुंबल्याने बाहेर पडणे मुश्किल झालेले. आपल्या आजारी वडिलांना वाचवण्यासाठी मुलीने प्रयत्न सुरू केले. डॉक्टर आणि 108 अ‍ॅम्ब्युलन्सला बोलवण्यात आले,परंतु जोरदार पावसामुळे ते पोहचले नाहीत. अखेर उपचारांअभावी तिच्या वडिलांनी शेवटचा श्वास घेतला.

सकाळपासून कोसळणारा जोरदार पाऊस. सर्वत्र तुंबलेले पाणी. या अशा परिस्थितीत विरारमधील नरोत्तम बारिया यांची तब्येत अचानक बिघडली. इमारतीबाहेर पाणी तुंबल्याने बाहेर पडणे मुश्किल झालेले. आपल्या आजारी वडिलांना वाचवण्यासाठी मुलीने प्रयत्न सुरू केले. डॉक्टर आणि १०८ अ‍ॅम्ब्युलन्सला बोलवण्यात आले,परंतु जोरदार पावसामुळे ते पोहचले नाहीत. अखेर उपचारांअभावी तिच्या वडिलांनी शेवटचा श्वास घेतला.

विरारमधील विराटनगर येथील शिवशक्ती इमारतीत राहणारे नरोत्तम बारिया हे सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बाथरुममध्ये चक्कर येऊन पडले. बाथरूममधून कसला तरी आवाज आल्याने उठलेल्या कोमल या त्यांच्या मुलीला ते विव्हळत असल्याचे दिसले. बारिया यांना श्वसनाचा त्रास होत होता. कोमलने वडिलांना बाथरूममधून बाहेर आणून तातडीने डॉक्टरांना दूरध्वनी केला. परंतु, जोरदार पडत असलेला पाऊस व रस्त्यावर कंबरेपर्यंत तुंबलेले पाणी यामुळे डॉक्टरांनी येणे अशक्य असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने ओळखीच्या दीपक कैतके यांना दूरध्वनी केला. त्यांनी 108 क्रमांकावर दूरध्वनी करून अ‍ॅम्ब्युलन्स बोलवण्याचा सल्ला दिला. पण पावसामुळे तो प्रयत्नही फोल ठरला.

- Advertisement -

अ‍ॅम्ब्युलन्स अर्ध्या रस्त्यावर येऊन तुंबलेल्या पाण्यात अडकून बंद पडली. पुन्हा तिने डॉक्टरांना फोन करण्यास सुरुवात केली. परंतु तिचे प्रयत्न असफल ठरत होते. अखेर तिने स्वत: इमारतीबाहेर पडून रिक्षा किंवा काही मदत मिळते का? यासाठी प्रयत्न सुरू केले. पण पहाटेच्या सुमारास कोणीही नसल्याने तिला मदत मिळाली नाही. कोणतीच मदत मिळत नसल्याने अखेर तिने आपली मैत्रिण लक्षणा हिला दूरध्वनी केला. तिने एका डॉक्टरचा दूरध्वनी क्रमांक दिला. त्यांना दूरध्वनी केल्यानंतर त्यांनी पाऊस प्रचंड असल्याने मी येऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर तिने आणखी एका डॉक्टरला दूरध्वनी केल्यानंतर त्याने प्रथम पाऊस थांबवल्यावर व नंतर पाणी कमी झाल्यावर येतो असे तिला सांगितले. आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार्‍या कोमलच्या प्रयत्नांना कोणत्याही प्रकारचे यश आले नाही. अखेर त्यांनी घरात अंथरुणावर शेवटचा श्वास घेतला.

नरोत्तम नारायण बारिया हे सायकल पंक्चरचे दुकान चालवून घराचा चरितार्थ चालवत होते. त्यांना दोन मुली असून, एका मुलीचे लग्न झाले आहे. तर कोमल नुकतेच पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून तांत्रिक प्रशिक्षण घेत आहे. सहा महिन्यांपासून नरोत्तम यांना श्वसनाचा त्रास होता. त्यांना कर्करोग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर जे. जे. हॉस्पिटल आणि टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच जे. जे. हॉस्पिटलमधून त्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले होते.

- Advertisement -

पहाटे होत असलेल्या जोरदार पावसामुळे इमारतीबाहेर कंबरेपर्यंत पाणी तुंबले होते. रस्त्यावर एकही दुकान सुरू नव्हते. तसेच रिक्षावालेही नव्हते. त्यामुळे कोणती मदतही मिळत नव्हती. डॉक्टरांनीही येण्यास नकार दिल्याने माझ्या वडिलांचे निधन झाले.

– कोमल बारिया

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -