पाणी तुंबलेल्या ठिकाणांना महापौर, आयुक्तांच्या भेटी!

कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू

मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल तसेच मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी हिंदमाता, बीकेसी पम्पिंग स्टेशन,  किंग सर्कल, मिठी नदी, दहिसर,आदी ठिकाणी भेट दिली. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कांदिवली येथे कोसळलेल्या दरडीची पाहणीही केली

मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करीत आहेत. यावेळी त्यांनी  वांद्रे पूर्व परिसरातील ओएनजीसी पातमुखाजवळील भागाची महापालिका आयुक्तांनी पाहणी केली, त्यानंतर  त्यांनी मिठी नदी लगत असणाऱ्या कुर्ला परिसरातील क्रांतीनगर भागाची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.  त्यानंतर त्यांनी किंग सर्कल येथील गांधी मार्केट परिसरातील साचलेल्या पाण्याचाही आढावा घेतला. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यांनीही या भागातील पाण्याचा आढावा घेतला.या पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांच्या समवेत अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरसू, अतिरिक्त  आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, महापालिका आयुक्तांचे उपायुक्त  चंद्रशेखर चोरे, पायाभूत सुविधा विभागांचे संचालक  संजय दराडे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

तर महापौर किशोरी पेडणेकर यांनीही परळच्या हिंदमाता येथील जलमय झालेल्या परिसराची पाहणी करून महापालिका अधिकाऱ्यांना योग्य ते  दिशानिर्देश दिले. त्यानंतर दहिसरच्या श्रीकृष्णनगर येथील पुलावरून महापौरांनी दहिसर नदीची पाहणी केली तसेच त्यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील मिनी पंपिंग स्टेशनला  भेट देऊन पाणी उपसा करणाऱ्या पंपाची पाहणी केली. कलानगर तसेच इंदिरानगर या परिसरात भरणाऱ्या पाण्याचा उपसा या पंम्पिंग स्टेशनद्वारे केला जातो.

डोंगर सुरक्षित करा

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कांदिवली येथे मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या बाबीची दखल घेऊन घटनास्थळाला महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच रस्त्यावर पडलेला मलमा त्वरित काढून रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्याची सूचना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केली. तसेच  नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने डोंगराला संरक्षक जाळी लावून डोंगर सुरक्षित करण्याचे निर्देशही महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना  दिले.


हे ही वाचा – ‘रहते हैं शीषमहलों में जो, वो अवाम से दूरी बनाया करते हैं !’ अमृता फडणवीसांच नवं ट्वीट