घरमुंबईभंडार्‍यातील विवानची थेट हॉलिवूड चित्रपटात झेप

भंडार्‍यातील विवानची थेट हॉलिवूड चित्रपटात झेप

Subscribe

परिश्रमाने सर्व काही साध्य करता येते. परिस्थितीवर मात करून विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावातील विवान तिवारीने थेट हॉलिवूड चित्रपटात एन्ट्री केली आहे. आपल्या गरीब परिस्थितीवर मात करून विवानने द गांधी मर्डर या हॉलिवूड चित्रपटात पोलीस निरीक्षक ओंकारची भूमिका साकारली आहे. विवान हा मूळचा भंडार्‍याजवळील वरटी गावाचा रहिवासी आहे. शालेय जीवनापासून म्हणजे ८ व्या वर्गातच त्याला अभिनयाचा छंद होता. आज त्याला या छंदाने हॉलिवूडमध्ये पोहचविले.

विवान हा अभियांत्रिकी पदवीधर असून सध्या टाटा स्टील कंपनीमध्ये तो ज्युनिअर इंजिनिअर पदावर कार्यरत आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने स्वकर्तृत्वावरच पुढे जाण्याचे त्याचे स्वप्न होते. विवान नागपूरच्या गर्व्हमेंट पॉलिटेक्निकमधून टेली कम्युनिकेशन विभागात डिप्लोमा पूर्ण केला. पुढे पदवी मिळवली व स्वत:च्या पायावर उभा राहिला, मात्र त्याला अभिनय स्वस्थ बसून देत नव्हता. आपले छोटे छोटे अभिनयाचे व्हिडिओ त्याने ऑडिशन इंडिया या वेबसाईटवर अपलोड केले.

- Advertisement -

भाषा प्रभुत्वामुळे मिळाली संधी
विवानचे इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्याला ही संधी मिळाली आहे. विवानची हिंदी भाषेसोबतच इंग्रजी भाषेवरही त्याचे चांगले प्रभुत्व आहे. नोकरी करत असताना तो आपल्या अभिनयाचे छोटे छोटे व्हिडिओ तयार करून ऑडिशन इंडिया या वेबसाईटवर अपलोड करायचा. त्याला शालेय जीवनापासूनच अभिनयाचा छंद होता. विवानने त्याला मिळालेल्या संधीचे खर्‍या अर्थाने सोने करून दाखवले.

अभिनयाच्या छंदामुळे यश
द गांधी मर्डर हा चित्रपट देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आधारित आहे. स्वातंत्र्यकाळापूर्वी देशाची परिस्थिती व गांधी यांच्यावर झालेले जीवघेणे हल्ले तसेच त्यासंबंधी पोलीस तपास यावर हा संपूर्ण चित्रपट आधारित असल्याची माहिती त्यांनी दैनिक आपलं महानगरला दिली. या चित्रपटात भारतातील सुप्रसिद्ध कलाकारांसोबतच विदेशी कलाकारसुद्धा काम करीत आहेत. विवानने स्वीकारलेली जबाबदारी आणि त्याच बरोबर त्याने जोपासलेला अभिनयाचा छंद यामुळे या दोन्ही कार्यात तो यश प्राप्त करू शकला आणि जिद्द पूर्ण करत वरटी या गावातून थेट हॉलिवूडपर्यंत पोहोचला.

- Advertisement -

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -