गिधाडांच्या पिल्लांची ३ ऑक्टोबरला भरारी…

गिधाडे म्हणजे निसर्गातील सफाई करणारे स्वच्छतादूत. रायगड परिसरात ‘ लाँगबील व्हल्चर’ आणि ‘ व्हाईटबॅक व्हल्चर’ या गिधाडांच्या दोन जाती आढळतात. या गिधाडांचे संवर्धन करण्याचे काम महाडमधील सीस्कॅप संस्था करते. या संस्थेने वनविभागाच्या सहकार्याने जखमी अवस्थेत सापडलेल्या चार पिल्लांचे संवर्धन केले आहे. गिधाडांची ही पिल्ले आकाशात झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहेत. ही पिल्ले ३ ऑक्टोबरला जागतिक वन्य दिन सप्ताहाच्या निमित्ताने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

सात महिन्यांपूर्वी १२ मार्चला सिस्कॅप संस्थेच्या सदस्यांना गिधाडांची काही पिल्ले जमिनीवर पडलेली आढळली. यापैकी सहा पिल्लांचे संगोपन सिस्कॅपकडून वनखात्याच्या परिसरात करण्यात आले. यातील दोन पिल्लांनी सशक्त झाल्यावर स्वत:हून आकाश भरारी घेतली. आता उर्वरित चार पिल्लांचे संगोपन करण्यात आले असून, त्यांना मोकळ्या अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वादळवार्‍यामुळे गिधाडांच्या घरट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गिधाडांची पिल्ले प्रथमच आकाश भरारी घेण्याचा प्रयत्न करीत असताना जमिनीवर पडून जखमी होतात. सिस्कॅपचे सदस्य या अशा ठिकाणी कायम लक्ष ठेवत असतात आणि त्या पिल्लांचे संवर्धन करीत असतात. सिस्कॅपच्या वतीने सहा ठिकाणी गिधाडांचे अधिवास संरक्षित करण्याबरोबरच त्यांच्या खाद्यासाठी ‘ढोरटाकी’ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

एकेकाळी रायगड जिल्हा गिधाडांसाठी नंदनवन म्हणून ओळखला जायचा. हे चित्र गेल्या २५-३० वर्षात बदलले. वारंवार उद्धभवणारी नैसर्गिक आपत्ती आणि किटकनाशकांचा अवाजवी वापर गिधाडांच्या मुळावर उठली आहे. प्राण्यांना दिले जाणारे औषध गिधाडांसाठी काहीवेळा विष ठरते. उंच झाडांची कमी झालेली संख्या, अन्नाची होत असलेली कमतरता यांमुळे गिधाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही परिस्थिती बदलण्यात सीस्कॅप संस्थेला यश येत आहे . प्रेमसागर मेस्त्री आणि त्यांच्या सहकार्‍यांमुळे सीस्कॅपच्या माध्यमातून रायगडात गिधाडांचे अस्तित्व टिकून आहे.