घरमुंबईकोणी जागा देते का जागा

कोणी जागा देते का जागा

Subscribe

मुंबई:- ठाणे-पालघरमधील गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या वस्तू व नमून्यांचे तत्काळ विश्लेषण व्हावे यासाठी ठाण्यामध्ये स्वतंत्र लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (मिनी फॉरेन्सिक लॅब) उभारण्याला 2016 मध्ये मंजुरी देण्यात आली. लॅबसाठी सर्व परवानगी व निधीही मंजूर झाले आहे. मात्र दोन वर्षे झाली तरी फॉरेन्सिक लॅबला ठाण्यामध्ये जागाच उपलब्ध होत नसल्याचे उघडकीस आले आहे. जागेचा शोध घेण्यासाठी गृह विभाग व फॉरेन्सिक लॅब प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना अपयश येत असल्याने लॅब सुरू होण्यात अडचणी येत आहेत.

राज्यात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनाच्या अधिपत्याखाली मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नांदेड व कोल्हापूर या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब आहेत. विविध गुन्ह्यांमधील जप्त केलेल्या वस्तू या फॉरेन्सिक लॅबमध्ये शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करण्यासाठी राज्यभरातून पाठवण्यात येतात. फॉरेन्सिक लॅबचा हा अहवाल न्यायालयामध्येही वैज्ञानिक पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. त्यामुळे गुन्ह्यांची उकळ करण्यामध्ये या लॅबची महत्त्वाची भूमिका आहे. ठाणे-पालघरमधील गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले नमूने मुंबईतील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येतात. परंतु यांची तपासणीस विलंब होत असल्याने गुन्ह्यांची उकल करण्यात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन ठाणे-पालघरमधील गुन्ह्यांसाठी ठाण्यामध्ये अत्याधुनिक मिनी लॅब उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला.

- Advertisement -

या मिनी लॅबमध्ये जीवशास्त्र व डीएनए तपासणीसंदर्भात दोन विभाग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. मात्र अनेक महिन्यांपासून लॅब उभारणीसाठीची जागा सरकारला मिळत नसल्याने गृह विभागाची कोंडी झाली आहे. ठाणे महापालिका आयुक्तांनी कायमस्वरुपी जागा देण्याची तयारीही दर्शवली मात्र बांधकामाला लागणार्‍या वेळेमुळे भाड्याने जागा घेण्याकडे विभागाचा कल होता. त्यानुसार ठाण्यातील सर्व सरकारी विभागाकडे विचारणा करण्यात आली. परंतु कोणाकडे जागा उपलब्ध नसल्याचे लॅबचा शुभारंभ लांबणीवर पडत आहे. सरकारी विभागांकडे जागा उपलब्ध नसल्याने गृह विभागाकडून खासगी जागा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जागा भाडे तत्त्वावर घेण्यासंदर्भात सरकारकडून मान्यताही मिळाली आहे, पण खासगी जागाही मिळण्यात अडचणी येत आहेत. मात्र जागेअभावी फॉरेन्सिक लॅबसाठी लवकरच जागा मिळेल असा विश्वासही गृह विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

ठाण्यातील मिनी फॉरेन्सिक लॅब जागेच्या प्रतीक्षेत

ठाण्यामध्ये उभारण्यात येणार्‍या फॉरेन्सिक लॅबसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणेची खरेदी झाली आहे. परंतु जागा उपलब्ध नसल्याने अद्याप लॅब सुरू झालेली नाही. आम्ही भाडेतत्त्वावर जागा शोधत असून, ती मिळाल्यास सहा महिन्यातच लॅब सुरू होईल.
– सुनील सोवितकर, सहसचिव, गृहविभाग

- Advertisement -

फॉरेन्सिक लॅबसाठी दोन महिन्यांपासून शोध घेत आहोत. ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला आहे. परंतु योग्य जागा मिळालेली नाही. कायमस्वरुपी जागा देण्याची तयारी महापालिका आयुक्तांनी दर्शवली असली तरी बांधकामाला वेळ लागणार असल्याने भाडेतत्त्वावर जागा घेत आहोत.
– डॉ. के. व्ही. कुलकर्णी, संचालक, फॉरेन्सिक लॅब

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -