घरताज्या घडामोडीभांडुप जलशुद्धीकरण संकुलात नॅशनल पार्कमधून होणारा पाण्याचा शिरकाव रोखणार

भांडुप जलशुद्धीकरण संकुलात नॅशनल पार्कमधून होणारा पाण्याचा शिरकाव रोखणार

Subscribe

जलशुद्धीकरण केंद्राभोवती संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.  

रविवारी मुंबईकरांवर मुसळधार पावसाने अस्मानी संकट कोसळले असताना भांडुप येथील जलशुद्धीकरण संकुलात पावसाचे पाणी शिरल्याने पाणीपुरवठा यंत्रणेवर परिणाम झाला. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीबाणीचे संकट ओढवले आणि घरातील नळ कोरडे पडले. या घटनेला नॅशनल पार्कमधून जमा झालेले पावसाचे पाणी कारणीभूत असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता पालिकेकडून कडक उपाययोजना युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार आहे. पावसाळ्यात नॅशनल पार्कमध्ये जमा होणारे व पुढे भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरणारे पाणी रोखण्यात येणार आहे. त्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राभोवती संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.

तसेच नॅशनल पार्क येथे जमा होणारे पावसाचे पाणी नजीकच्या तुळशी तलावात वळविण्यात येणार आहे. त्याकरिता लवकरच, विशेष प्रवाह मार्ग बांधण्यात येणार आहे. १७ जुलै रोजी रात्रीनंतर अवघ्या काही तासांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भांडुप जलशुद्धीकरण संकुलामध्ये पावसाचे पाणी शिरुन झालेल्या नुकसानीची पालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सोमवारी पाहणी केली.

- Advertisement -

भांडुप जलशुद्धीकरण संकुलात ६५ टक्के पाण्याचे शुद्धीकरण

भांडुप जलशुद्धीकरण संकुल हा संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा असा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. संपूर्ण मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यापैकी सुमारे ६५ टक्के पाण्याचे शुद्धीकरण या एकट्या प्रकल्पामध्ये केले जाते. संकुलातील दोन पैकी एका जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन १,९१० दशलक्ष लीटर तर दुसऱ्या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन ९०० दशलक्ष लीटर इतकी आहे.

या जलशुद्धीकरण संकुलात पावसाचे पाणी शिरल्यानंतर संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून आणि संयंत्रे सुरक्षित राखण्यासाठी विद्युत पुरवठा देखील बंद करावा लागला. परिणामी मुंबईतील बहुतांश भागांमध्ये रविवारी पाणीपुरवठा बाधित झाला होता. महापालिकेच्या जल खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अक्षरशः युद्धपातळीवर कार्यवाही करुन पावसाचे पाणी उपसले, संयंत्रे दुरुस्ती करुन पाणीपुरवठा पूर्ववत केला. पावसाचे पाणी नेमके संकुलात कसे शिरले, संयंत्रे दुरुस्ती करताना प्रत्यक्षात काय अडथळे जाणवले, याबाबतची संपूर्ण माहिती उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर यांनी यावेळी अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांना सादर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -