वाणी ज्ञानेश्वरांची

 

आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु । कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥
ज्याप्रमाणे इतर दगडासारखे परीस काही पुष्कळ सापडत नाहीत, अथवा लेशमात्र अमृत प्राप्त होण्यासदेखील दैवयोगच लागतो,
तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि । जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥
त्याप्रमाणे, परमेश्वरप्राप्तीतच जिचे पर्यवसान होते अशी ही सद्बुद्धि फार दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे गंगेचे पर्यवसान निरंतर समुद्रच आहे,
तैसें ईश्वरावांचुनी काहीं । जिये आणीक लाणी नाहीं । ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥
त्याप्रमाणे अर्जुना, जिला ईश्वरप्राप्तीवाचून दुसरी काही प्राप्ती नाही, अशी जगतामध्ये एकच बुद्धि आहे.
येर ते दुर्मति । जे बहुधा असे विकरति । तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥
इजशिवाय इतर बुद्धि त्या दुर्बुद्धि होत; त्यांचे ठिकाणी विकार उत्पन्न होतात व तेथे अविचारी लोक नेहमी रमतात.
म्हणौनि तयां पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था । आत्मसुख सर्वथा । द्दष्ट नाहीं ॥
म्हणून अर्जुना, त्या लोकांना स्वर्ग, संसार आणि नरकावस्था प्राप्त होते; परंतु आत्मसुख कधी मिळत नाही.
वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती । परी कर्मफळी आसक्ती । धरूनियां ॥
ते वेदाच्या आधाराने बोलून कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व स्थापन करतात; परंतु त्या कर्माच्या फळावर लोभ ठेवतात.
म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादिक कर्म कीजे । मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥
त्याचे असे म्हणणे असते की, मृत्युलोकी जन्म घेऊन यज्ञादिक कर्मे आचरावी व आनंददायक असे स्वर्गसुख भोगावे.
एथ हें वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाहीं । ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥
अर्जुना, ते दुर्बुद्धि नेहमी असे म्हणतात की, इथे या स्वर्गसुखावाचून आणखी दुसरे सुखच नाही.