घरमुंबईमुंबई महापालिका निवडणूक: ओबीसी वगळून लॉटरीद्वारे आरक्षण सोडत निघणार

मुंबई महापालिका निवडणूक: ओबीसी वगळून लॉटरीद्वारे आरक्षण सोडत निघणार

Subscribe

शासन निर्णय व निवडणूक आयोग यांच्या मान्यतेनुसार यंदा पालिकेच्या वार्डाची संख्या ९ ने वाढवून २२७ वरून आता २३६ एवढी करण्यात आली आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ओबीसी (obc) वगळून प्रथमच आरक्षण सोडत होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ( Mumbai Municipal Corporation elections) सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी आरक्षण (reservation) सोडतीबाबत राजकीय पक्ष आतुर झाले आहेत. ही आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाचे ( State Election Commission) अधिकारी, पालिका आयुक्त व प्रशासक इक्बाल चहल यांच्या उपस्थितीत व पालिका शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत वांद्रे, रंगशारदा येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीकडे गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असलेले इच्छुक उमेदवार  चातकासारखी वाट पाहत आहेत. आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर विविध राजकीय पक्षातील इच्छुक, अभ्यासू, अनुभवी नगरसेवकांच्या व नवीन उमेदवारांच्या इच्छा आकांक्षावर आरक्षण सोडतीचा फटका बसल्याने पाणी फिरणार आहे.

शासन निर्णय व निवडणूक आयोग यांच्या मान्यतेनुसार यंदा पालिकेच्या वार्डाची संख्या ९ ने वाढवून २२७ वरून आता २३६ एवढी करण्यात आली आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ओबीसी (obc) वगळून प्रथमच आरक्षण सोडत होणार आहे. मागासवर्गीयांसाठी १९९४ पासून २७ टक्के आरक्षण लागू झाले. यंदाच्या निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रथमच मागासवर्गीयांचे २७ टक्के आरक्षण ( पूर्वीच्या सूत्रानुसार ६१ जागा ) वगळून अनुसूचित जातीसाठी १५ जागा, अनुसूचित जमाती २ जागा व ५० टक्के म्हणजे ११८ जागा महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

- Advertisement -

अशी काढली जाणार आरक्षण सोडत

या आरक्षण लॉटरी सोडतीमध्ये, सलग तीन निवडणुकीत आरक्षित नसलेले वार्ड (ward) आरक्षित होतील  तसेच, २००७ च्या निवडणुकीत महिलांना राखीव झालेला वार्ड पण २०१२ आणि २०१७ मध्ये नसल्यास महिलांना प्राधान्य
देण्यात येणार आहे. तसेच, २००७ मध्ये  वार्ड महिलांसाठी राखीव असलेला मात्र २०१२ व २०१७ मध्ये राखीव नसल्यास आरक्षणासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच या आरक्षण सोडतीत प्रथम, अनुसूचित जातीच्या १५ जागांसाठी, अनुसुचित जमातीच्या २ जागांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर, अनुसूचित जातीच्या १५ जागांपैकी महिलांसाठी ८ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहेत. तसेच, अनुसुचित जमातीच्या २ जागांपैकी महिलांसाठी १ जागेकरिता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर एकूण २३६ जागांपैकी ११८ जागा महिलांसाठी आरक्षित करताना अनुसूचित जाती महिलांच्या ८ जागा व अनुसूचित जमातीच्या १ अशा ९ जागा निश्चित झाल्यानंतर महिलांच्या उर्वरित १०९ जागांसाठी आरक्षण सोडत काढली जाईल.

- Advertisement -

१३ जूनला अंतिम आरक्षण सोडत

या आरक्षण सोडतीनंतर त्यावर ६ जूनपर्यंत हरकती व सूचना जनतेकडून मागवण्यात येणार असून त्यांचा न्यायनिवाडा झाल्यावर १३ जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर मतदार याद्या २३६ प्रभागानुसार तसेच बुथ नुसार बनवल्या जाणार आहेत. त्यावरही हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यासाठी किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर निवडणूक तारीख जाहीर होईल व आचारसंहिता लागू होईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -