मुंबईतील महापालिका आणि खाजगी शाळांमध्ये सुरु झाली ‘वॉटर बेल’

शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी नगरसेवक पदावर कार्यरत असताना, १२ डिसेंबर २०१९ रोजी महापालिकेच्या सभागृहात एक ठराव मांडला होता. त्या ठरावात बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्याकरिता एका सत्रात तीन वेळा घंटा वाजवावी, असे म्हटले होते. हा ठराव ऑक्टोबर २०२० मध्ये महापालिका सभागृहात एक मताने मंजूर होऊन आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला होता.

मुंबईः मुंबईतील सर्व महापालिका तसेच खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी वॉटर बेल या संकल्पनेची अमंलबजावणी मंगळवार पासून सुरु झाली आहे. शिवडी कोळीवाडा येथील महापालिका शाळेपासून ही संकल्पना राबविण्यास सुरवात झाली आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी  १२ डिसेंबर २०१९ रोजी महापालिकेच्या सभागृहात एक ठराव मांडला होता. त्या ठरावात बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्याकरिता एका सत्रात तीन वेळा घंटा वाजवावी, असे म्हटले होते. हा ठराव ऑक्टोबर २०२० मध्ये महापालिका सभागृहात एक मताने मंजूर होऊन आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर आयुक्त इकबाल चहल यांनी, तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेऊन याची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागासाठी एक परिपत्रक काढले होते. पण या निर्णयाची अंमलबजावणी शिक्षण खात्याने अद्यापपर्यंत केली नव्हती. त्यामुळे सचिन पडवळ यांनी, त्याबाबत तीव्र नाराजी पालिका प्रशासनाकडे व्यक्त केली होती.

त्यानंतर सचिन पडवळ यांनी शिक्षण खात्याला फेब्रुवारी २०२३ मध्ये पत्र पाठवून पलिका शाळांमध्ये पाण्याची घंटा कधी वाजणार, असा सवाल विचारला होता.अखेर आता पालिका शिक्षण खात्याकडून या उपक्रमाच्या अंमलबजावणीला आता शिवडी येथील पालिका शाळेपासून सुरुवात झाली आहे. या संदर्भात पालिकेच्या शिक्षण विभागाने मुंबईतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना परिपत्रक पाठवले आहे. या उपक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा आपणास जबाबदार धरण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असा इशाराही या परिपत्रकात देण्यात आला आहे.

अन्न पचविणे, रक्ताचे वहन सुलभ करणे, पोषण मूल्ये सर्व अवयवांपर्यंत पोहोचविणे, शरीरातील सर्व विजातियांचे शरीरातून विर्सजन करणे, शरीराचे तापमान समतोल राखणे इत्यादी अशी महत्त्वपूर्ण कार्ये शरीरातील पाणी करीत असते. मनुष्य एकवेळ अन्नाशिवाय ८ ते १० दिवस जगू शकतो. मात्र पाण्याशिवाय जगूच शकत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन असे संबोधण्यात येते. दिवसभरात ठराविक वेळेच्या अंतराने आवश्यक प्रमाणात पाणी पिणे हे आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक आहे. विद्यार्थीदशेत लहान मुलांचा दिवसातील ५ ते ७ तासांचा कालावधी शाळेत व्यतित होतो. ह्या कालावधीत त्यांनी किमान तीन वेळा पाणी पिणे आवश्यक आहे. तथापि, अभ्यास, खेळ यात व्यग्र असल्याने विद्यार्थी पाणी पिणे टाळतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्याना यूरिनरी इन्फेक्शन समस्या, वांती, डिहायड्रेशन, चक्कर येणे इ. समस्या भेडसावतात.

दिवसभर शालेय विद्यार्थ्याना हायड्रेट ठेवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे की, सर्व शाळांमध्ये “Water Bell” ही संकल्पना राबविणे अत्यावश्यक आहे. म्हणून परिपत्रका अन्वये सर्व मुख्याध्यापकांना असे आदेश देण्यात आले आहेत की, प्रत्येक अधिवेशनामध्ये मधली सुट्टी पकडून दुस-या व सहाव्या तासिकेनंतर विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेत घंटा वाजविण्याची व्यवस्था करण्यात यावी. सदरहू उपक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा आपणास जबाबदार धरण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.