घरताज्या घडामोडीमुंबईच्या तलाव क्षेत्रात १३ दिवसांचा पाणी साठा वाढला

मुंबईच्या तलाव क्षेत्रात १३ दिवसांचा पाणी साठा वाढला

Subscribe

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांमध्ये पावसाने पाठ फिरवत जून महिना कोरडा घालवल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्याभरातच मुसळधार बरसात करत तलावांच्या पातळीत भर पाडली आहे. मागील दोन दिवसांमध्ये तलाव क्षेत्रात धुवाँधार पावसाची बरसात होत असल्याने एकूण पाणी साठ्यात ५१ हजार ६८५ दशलक्ष लिटर अर्थात ५ हजार १६८ कोटी लिटर एवढा पाणी साठा वाढला आहे. मुंबईला सध्या होणाऱ्या ३८५० दशलक्ष लिटर अर्थात ३८५ कोटी लिटर पाण्याच्या तुलनेत हा साठा १३ दिवसांनी वाढलेला आहे.

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी आदी तलाव तसेच धरणांमधून दरदिवशी होणाऱ्या ३८५० दशलक्ष लिटर अर्थात ३८५ कोटी लिटर एवढ्या पाण्याचा पुरवठा होता. मात्र तलाव क्षेत्रात मागील जून महिना कोरडा गेला असला तरी ४ ते ६ जुलै २०२० रोजी या काळात सर्व धरण व तलावांमधील पाणी साठ्यात ५१ हजार ६८५ दशलक्ष लीटर एवढी वाढ झाली आहे. ४ जुलै रोजी या सर्व तलावातील पाणीसाठा हा १ लाख ९ हजार ७ दशलक्ष लीटर एवढा होता. तर सोमवारी हा पाणीसाठी १ लाख ६० हजार ६९२ दशलक्ष लीटर एवढा झाला आहे.

- Advertisement -

यामध्ये सर्वाधिक म्हणजे ३८ हजार २०८ दशलक्ष लीटरची वाढ ही भातसा मध्ये, तर या खालोखाल ३ हजार ८०७ दशलक्ष लीटरची वाढ विहार तलावात झाली आहे. यानंतर तानसा तलावात २ हजार २२१ दशलक्ष लीटर, तुळशी तलावात २ हजार ३८ दशलक्ष लीटर आणि मध्य वैतरणा १ हजार ९३० दशलक्ष लीटरची वाढ झाली आहे. तर अप्पर वैतरणा तलावातील जलसाठ्यात कोणतीही वाढ नोंदवण्यात आलेली नाही.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या साठ्यात वाढ झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा अद्यापही कमी आहे. मागील ६ जुलै २०१९ रोजी सातही तलावांचा एकूण पाणीसाठा हा २ लाख १६ हजार ५२२ दशलक्ष लीटर एवढा होता, जो यंदाच्या तुलनेत ५५ हजार ८३० दशलक्ष लीटरने अधिक होता. तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच ६ जुलै २०१८ रोजी ३ लाख ५५ हजार ३६० दशलक्ष लीटर एवढा होता, जो यंदाच्या पाणीसाठ्यापेक्षा दुपटीनेही अधिक होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -