Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई उल्हासनगरात ३६ तासांचा 'वॉटर जाम'; फर्निचर बाजारातलं पाणी ओसरलं!

उल्हासनगरात ३६ तासांचा ‘वॉटर जाम’; फर्निचर बाजारातलं पाणी ओसरलं!

उल्हासनगरमधील फर्निचर मार्केटमध्ये तब्बल ३६ तास साचलेलं पाणी अखेर चोकअप निघाल्यामुळे मोकळं झालं आहे.

Related Story

- Advertisement -

शुक्रवारी सकाळी पाण्यात बुडालेल्या फर्निचर बाजारातील पाणी शनिवारी दुपारी लिंक रोडच्या नाल्यातील चोकअप निघाल्यानंतर ओसरले. मात्र हा चोकअप निघाल्यावर खेमानीपासून लिंक रोडपर्यंत नाल्यात अडकलेला कचरा घाणेरड्या पाण्याबरोबर फर्निचर बाजारातील दुकानांमध्ये शिरला. हे घाणेरडे पाणी बाजारात अस्ताव्यस्त पसरल्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. या दोन दिवसांत पाण्यामुळे फर्निचर बाजारात व्यापाऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. खेमानी परिसर, सेवा सदन आणि नेहरू चौक या परिसरातील पाणी लिंक रोड मार्गे वुडलँड कॉम्प्लेक्सच्या नाल्यात जाते. हा नाला विकास नर्सिंग होम ते चौहान इलेक्ट्रिक असा ६०० फूट भूमिगत आहे. हा नाला तुंबल्यामुळे फर्निचर बाजारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

आख्खा फर्निचर बाजार पाण्याखाली

सेवासदन कडून लिंक रोड कडे येणारा नाला तुंबल्यामुळे फर्निचर बाजारातील दुकानांमध्ये मागच्या बाजूने पाणी शिरून पुढून बाहेर येत होते. हीच परिस्थिती नेहरू चौक ते मध्यवर्ती रुग्णालय रस्त्यावर होती. या रस्त्यावरील वाहेगुरू फर्निचर, अॅल्युमिनियम शॉप, मटेरियल सप्लाय आदी दुकानांमध्ये साचलेले पाणी बाहेर काढण्याचे काम जोरात चालू होते. नेहरू चौक, हनिमून कॉटेज, रिजेंसी मैरेज हॉल, वुडलँड कॉम्प्लेक्स, पूरब पच्छिम अपार्टमेंट, गोल्डन पार्क, कुमार डिपार्टमेंट, मध्यवर्ती शासकीय हॉस्पिटल रोड, शेवटी फर्निचर बाजारातील लिंक रोडवर ब्रेकरच्या सहाय्याने एक मोठं होल करून पाण्याचा निचरा करण्यात आला. मात्र हा प्रयत्न शंभर टक्के यशस्वी झाला नाही. यावेळी वाहतूक बंद करण्यात आल्याने ट्राफिक जाम झाले होते. सोना मार्केट परिसर, कृष्णा अपार्टमेन्ट, चाळीस खोली परिसर आदी परिसरातील रहिवासी आणि कारखान्यांमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्यामुळे रहिवासी आणि कामगार रस्त्यावर उतरले. त्यांनी काही काळ रस्ता अडवल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.


हेही वाचा – पहिल्याच पावसात ठाण्यात पाणीच पाणी!

फर्निचर व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान

- Advertisement -

लिंक रोडवर लावलेल्या ब्रेकरच्या व्हायब्रेशनने अखेर दुपारी १ वाजताच्या सुमारास लिंक रोड नाल्यातील चोकअप उघडला. या चोकअपमधील कचरा आणि नाल्याचे काळे पाणी फर्निचर बाजारात अस्ताव्यस्त पसरले. फूटपाथपासून कमी उंचीवर असलेल्या फर्निचर बाजारातील माया, प्रेमसन, जीवन छाया कॉम्प्लेक्स मधील दुकाने आदींमध्ये पाणी घुसले. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हे पाणी ओसरायला दुपारचे तीन वाजले. मोठ्या प्रमाणात आलेला कचरा हा रस्त्यावर पसरला होता. तो काढण्यासाठी पालिकेच्या तब्बल १०० सफाई कामगारांचे पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती विनोद केणे यांनी दिली.

वाहत आलेल्या पाण्यात सापडल्या दारूच्या बाटल्या!

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, सुरक्षा अधिकारी बाळू नेटके या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून तब्बल ३६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर लिंक रोडवरून वाहत्या पाण्याचा प्रवाह बंद केला. लिंक रोड नाल्याच्या स्लॅबला तीन ठिकाणी भगदाड पडले असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या चोकअपमध्ये साडी, प्लास्टिक, कप, दारूच्या बाटल्या, कपडे, चिंधी हे सर्व रहिवाशी आणि व्यापाऱ्यांनी नाल्यात टाकल्यामुळे पाणी अडकून लाखोंचे नुकसान झाले आहे. अशा वस्तू नाल्यात टाकणे टाळावे, असे स्थायी समिती सभापती राजेश वाधारिया यांनी आवाहन केले आहे.

- Advertisement -