घरमुंबई६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याने वांद्रे, खारचा पाणीपुरवठा तात्पूरता बंद

६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याने वांद्रे, खारचा पाणीपुरवठा तात्पूरता बंद

Subscribe

 

मुंबई: वांद्रे (पश्चिम) येथील वॉटरफिल्ड रोड येथे पर्जन्य जलवाहिनीच्या कामादरम्यान पालीहिल जलाशय येथील ६०० मिलीमीटर व्यासाची (इनलेट) जलवाहिनी अचानकपणे फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. परिणामी वांद्रे, खार आदी परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला. पाणीपुरवठा प्रकल्‍प विभागाने फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरूस्‍तीचे काम तातडीने हाती घेतले. रात्री उशिराने काम पूर्ण झाल्यावर सदर विभागांचा पाणीपुरवठा टप्प्या टप्प्याने सुरळीत होणार आहे.
यासंदर्भातील माहिती पालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागाचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली आहे.

- Advertisement -

वांद्रे (पश्चिम) येथील वॉटरफिल्ड रोड येथे पर्जन्य जलवाहिनीचे काम सुरू आहे. या कामादरम्यान सोमवारी सकाळी पालीहिल जलाशय येथील ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (इनलेट) अचानकपणे फुटली.
शेर्ली राजन रोड, चिंबई गाव, वरोडा रोड, मॅन्युएल गोन्झाल्व्हिस रस्त्यालगतचा परिसर, पेरी रोड, नवीन कांतवाडी परिसरातील पाणीपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ वाजेदरम्यान प्रभावित झाला. त्यामुळे ‘एच’/पश्चिम विभागामधील काही भागांचा पाणीपुरवठा प्रभावित झाला. महापालिकेने तातडीने जलवाहिनी दुरूस्‍ती काम हाती घेतले. खारदांडा, कोळीवाडा, दांडपाडा आणि खारमधील १६ ते २१ क्रमांकाच्या रस्त्यावर जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे. तथापि, काही काळासाठी पाण्याचा दाब आणि पुरवठ्याचा कालावधीही कमी राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यालगतच्या भागात दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रात्री ९ ते १२ या वेळेदरम्यान पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल.

जलवाहिनीचे निर्जलीकरण, दुरुस्ती आणि चार्जिंगसह दुरुस्तीसाठी सुमारे ८ ते १० तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि पाण्याचा काटकसरीने उपयोग करावा, असे आवाहन जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे.

- Advertisement -

गेल्या महिनाभरापासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम सुरु होते. त्यामुळे मुंबईत पाणी कपात जाहिर करण्यात आली होती. सुमारे महिनाभर पाणी कपात लागू होती. रविवारपासून मुंबईचा पाणीपुरवठा पुर्ववत करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -