घरमुंबईWater Supply Problem : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! जलवाहिनी गळतीमुळे पाणीबाणी, टँकरही...

Water Supply Problem : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! जलवाहिनी गळतीमुळे पाणीबाणी, टँकरही मिळेना

Subscribe

अंधेरीत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मुंबईकरांना पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कालपासून (ता. 03 डिसेंबर) मुंबईतील अनेक भागांमधील पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. तर आजही तशीच परिस्थिती असल्याने पाण्यावाचून मुंबईकरांना वणवण फिरावे लागत आहे.

मुंबई : अंधेरी पूर्व येथे वेरावली – 3 सेवा जलाशयाला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम अद्यापही अथकपणे आणि अहोरात्र सुरू आहे. जलवाहिनी गळती ठिकाणची आव्हानात्मक स्थिती लक्षात घेवून दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी), जल अभियंता यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कामगार मिळून तब्बल 100पेक्षा जास्त मनुष्यबळ या गळतीच्या दुरुस्ती ठिकाणी तळ ठोकून आहेत. पण यामुळे मुंबईकरांना पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कालपासून (ता. 03 डिसेंबर) मुंबईतील अनेक भागांमधील पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. तर आजही तशीच परिस्थिती असल्याने पाण्यावाचून मुंबईकरांना वणवण फिरावे लागत आहे. तर पाण्याचे टॅंकरही उपलब्ध होत नसल्याची तक्रार मुंबईकरांकडून करण्यात आली आहे. (Water Supply Porblem: Mumbaikars use water carefully! Due to leakage of water channel, water supply and tankers were not available)

हेही वाचा – Water Supply : अंधेरीतील वेरावली जलवाहिनीचे दुरुस्ती काम पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न

- Advertisement -

मुंबईत सध्या पाणीबाणी सुरू झाली असून नागरिकांना पिण्याचेही पाणी मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. अंधेरीतील वेरावली जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने याचा मोठा फटका एच पूर्व, एच पश्चिम व के पश्चिम विभागांना बसला आहे. मुंबईतील या भागांतील पाणीपुरवठा हा गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचे टँकर मागविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण ते ही उपलब्ध होत नसून ज्या ठिकाणी ते उपलब्ध आहेत, त्यांच्याकडून अधिक दराची मागणी करण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामुळे आता मुंबईकरांना ही समस्या नेमकी किती दिवस असणार आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर पाणीपुरवठा होत नसलेल्या काही भागांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वतःचे टँकर वापरून 37 फेऱ्या आणि खासगी टँकरच्या 81 फेऱ्या असे मिळून एकूण 118 फेऱ्या करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. टँकर व्यवस्था केली असली तरी, पाणीपुरवठा बाधित झालेल्या परिसराची व्याप्ती लक्षात घेता, टँकर भरून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ पाहता प्रशासनावर मर्यादा येत आहेत.

ड्रिलिंग काम सुरू असताना अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक 3 आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ 1800 मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गुरुवार, दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी गळती सुरू झाली. यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने गळती दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले. शनिवार, दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.30 वाजेपासून ते रविवार, दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंत दुरूस्‍ती काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, दुरुस्ती काम सुरू झाल्यानंतर वेगवेगळी आव्हाने समोर आली. ज्यामुळे आता या दुरुस्तीच्या कामाला वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या ठिकाणी गळती लागली ती जलवाहिनी जमिनीत सुमारे सहा मीटर खोल आहे. तसेच या परिसरात अलीकडे बांधकाम झाल्यानंतर जमिनीचा भराव पूर्ववत केलेला असल्याने तुलनेने त्याची भूगर्भीय पकड सैल आहे. त्यामुळे अधूनमधून ती माती देखील गळती झालेल्या खड्ड्यात कोसळत आहे. स्वाभाविकच मुख्य जलवाहिनी पूर्ण रिकामी करण्याच्या दृष्टीने संपूर्ण पाण्याचा उपसा करणे आणि त्याचवेळी दुरुस्तीसाठी खोदकाम केलेल्या ठिकाणी भूस्खलन होऊ न देणे, हे अतिशय मोठे आव्हान पेलून दुरुस्ती विषयक कामे सुरू आहेत. एवढेच नव्हे तर या जलवाहिनीला वरून नव्हे तर आजूबाजूने आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी छिद्र होऊन गळती लागली आहे. त्यामुळे जलवाहिनी पूर्ण रिती झाल्यानंतर आत शिरून ही सर्व छिद्र बंद केली जातील, अशी माहिती प्रशासकीय यंत्रणांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -