हिंदमाता येथे पाच फुटापर्यंत साचणारे पाणी आता फक्त गुडघाभर; महापौरांचा दावा

मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणारच नाही, असा दावा आम्ही कधीही केलेला नाही, असे महापौर ठामपणे म्हणाल्या.

mumbai mayor kishori pednekar on hindmata waterlogging
हिंदमाता येथे पाच फुटापर्यंत साचणारे पाणी आता फक्त गुडघाभर; महापौरांचा दावा

मुंबईत पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे हिंदमाता येथे पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साचते. पूर्वी या ठिकाणी पावसाळ्यात पाच फुटापर्यंत पाणी साचत होते. मात्र, मुंबई महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आता फक्त गुडघाभर किंवा त्यापेक्षा कमी पाणी साचत आहे, असा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. वास्तविक, मुंबईतील सखल भागात पावसाळ्यात पाणी साचण्यास येथील भौगोलिक परिस्थिती आणि अतिवृष्टी कारणीभूत असल्याचे महापौरांनी आवर्जून सांगितले.

मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणारच नाही, असा दावा आम्ही कधीही केलेला नाही, असे महापौर ठामपणे म्हणाल्या. तसेच यापूर्वी हिंदमाता येथे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यावर कपड्यांचा सेल लागत होता. आता तो लागत नाही यावरून त्याठिकाणी पाणी कमी साचत आहे, असा दावाही महापौरांनी यावेळी केला.

पालिकेची उपाययोजना

मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास सखल भागात पाणी साचते. २६ जुलै २००५ ला मुंबईत पूरस्थिती निर्माण झाल्यावर ब्रिमस्टोवॅडच्या अहवालानुसार पालिकेने साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सहा ठिकाणी मोठ्या क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारले. आणखी दोन ठिकाणी असे पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

तसेच हिंदमाता येथे साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आता भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. त्यामुळे पाणी साचण्याचे प्रमाण कमी होणार आहे. यापूर्वी हिंदमाता येथे पाच फूट पाणी साचत होते. आता गुडघ्यापेक्षा कमी पाणी साचत आहे. या पाण्याचा निचरा काही तासात होत आहे. मात्र, गुडघाभर पाणीही साचू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे महापौरांनी सांगितले.