घरताज्या घडामोडीलग्नसराईवर कोरोनाचे गडद सावट; एप्रिल महिन्यातील १०० टक्के लग्न झाली रद्द

लग्नसराईवर कोरोनाचे गडद सावट; एप्रिल महिन्यातील १०० टक्के लग्न झाली रद्द

Subscribe

वऱ्हाडी नव्या नियमावलीच्या प्रतिक्षेत; आचाऱ्यांसह वाढप्यांवर उपासमारीची वेळ

“गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली. सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली”, असे म्हणत धुमधडाक्यात लग्न करण्यासाठी वऱ्हाडी मंडळींचा उत्साह काही वेगळाच असतो. तर विशेष म्हणजे वर्षभरापासून लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधूवरांचा आनंद तर गगनात मावेनासा असतो. वधूवर तर अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतात. मात्र, गेल्या वर्षभरापासून लग्नसराईच्या तोंडावर कोरोनाचे महाभयानक संकट असल्याने वयात आलेल्या अनेक तरुण-तरुणींचे लग्न न झाल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. ‘अहो कुठवर लॉकडाऊन, माझं लगीन गेलय राहून…’, अशा शब्दात ते आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना दिसत आहेत. वधूवरांसह त्यांच्या घरच्या मंडळींनाही आपल्या मुलांच्या लग्नाची काळजी वाटू लागली आहे. धुमधडाक्यात लग्न करुन आपल्या मुलांचे हात पिवळे करु इच्छिणाऱ्या वऱ्हाड्यांना आता गुपचूप २५ वऱ्हाड्यांमध्ये लग्न उरकावे लागत आहे. त्यामुळे वधू-वरांसह वऱ्हाडींमध्ये देखील नाराजी आहे. २५ लोकांमध्ये लग्न करण्यापेक्षा लग्न पुढे ढकलूया, असे म्हणत अनेकांनी आपली लग्न पुढे ढकलली आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात तब्बल १०० टक्के लग्न पुढे ढकलण्यात आली आहे. तर मे महिन्यात ज्यांची लग्न आहेत, ते नव्या नियमावलीच्या प्रतिक्षेत आहे. मात्र, यामुळे आचाऱ्यांसह वाढपींचे पूर्णत: नुकसान झाले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने ५० जणांच्या उपस्थितीत होणारी लग्न आता २५ जणांच्या उपस्थितीत करण्याचा नवा नियम लागू केला आहे. त्यामुळे २५ जणांमध्ये लग्नाला कोणाला बोलवावे, असा प्रश्न वऱ्हाडी यांच्या समोर आहे. त्यामुळे लग्न पुढे ढकलणेच योग्य ठरेल, असे म्हणत अनेकांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

एप्रिल महिन्यात १५०-२०० लग्न झाली रद्द

एप्रिल महिन्यात मोठ्या संख्येने लग्न पार पडतात. कारण या महिन्यात शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा संपून विद्यार्थ्यांना सुट्टी पडते. त्यामुळे बरीच मंडळी एप्रिल आणि मे महिन्यात लग्न ठरवतात. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. त्यात राज्य सरकारने नव्या नियमावलीनुसार २५ जणांच्या उपस्थितीत लग्नाला मान्यता दिली आहे. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींनी लग्न पुढे ढकलली आहेत. एप्रिल महिन्यात तब्बल १५० ते २०० लग्न पुढे ढकलण्यात आली.

वऱ्हाडी नव्या नियमावलीच्या प्रतिक्षेत

सध्या राज्य सरकारच्या नियमावलीनुसार २५ जणांच्या उपस्थितीत लग्न करण्यास मान्यता आहे. तसेच नेहमी धुमधडाक्यात होणारे लग्न आता शांतपणे करावे लागणार आहे. म्युझिक, डिजे, वरात आणि ढोल ताशांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ज्या वधू-वरांची लग्न मे महिन्यात आहेत. ती वऱ्हाडी नवी नियमावलीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना ३० एप्रिलनंतर येणारी नवीन नियमावली अपेक्षित असेल, अशी आशा वाटत आहे. त्यामुळे या वऱ्हाडी मंडळींनी मे महिन्यातील लग्न अद्याप रद्द केलेली नाहीत. परंतु, सध्याचा नियमच मे महिन्यात राहिला तर लग्न पुढे ढकलणार असल्याचे हॉलच्या मालकांना सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

आचाऱ्यांसह वाढपींना नोकरीवरुन काढण्याची आली वेळ

गेल्या अनेक वर्षांपासून कमवलेले एक ते दोन वर्षात संपले. आम्ही गेले दहा वर्ष मागे आलो आहोत. आमचा हाच व्यवसाय असल्यामुळे आमचे संपूर्ण पोट यावर आहे. मात्र, सध्या कोरोनामुळे राज्य सरकारने ज्या अटी लावल्या आहेत. त्यामुळे आमचा संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे आचाऱ्यांसह वाढपींना देखील आम्हाला कामावरुन काढावे लागले आहे. कारण आमचाच व्यवसाय बसल्यामुळे त्यांना तरी आम्ही पैसे कुठून देणार, असा प्रश्न आमच्या समोर आले. कारण आता हॉललाच टाळे लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आमचाही नाईलाज आहे. कारण आचार्यांसह आमचे देखील हातावर पोट आहे. त्यामुळे त्यांनाही निघून जा, अशी सांगण्याची वेळ आमच्यावर आली आहे.  – अविनाश पाटील, अण्णा साहेब वर्तक हॉल, मालक

हॉलनुसार उपस्थिती ठरवावी

राज्य सरकारने हॉलनुसार उपस्थिती ठरवावी. कारण ५०० लोकांचा हॉल असेल तर त्या हॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेऊन २०० ते २५० लोक सहज वावरु शकतात. मात्र, ५०० लोकांचा हॉल असेल तरी पण तुम्ही २५ जणांची उपस्थिती देत असाल तर त्यात हॉलचे मोठे नुकसान होते. कारण एसीचे भाडे, डेकोरेशन आणि हॉलचे भाडे त्याला खर्च हा २५ असो किंवा ५०० लोक असो, खर्च हा तेवढाच येतो. त्यामुळे राज्य सरकारने हॉलच्या उस्थितीनुसार अर्ध्यांच्या उपस्थिती करता मान्यता द्यावी, अशी मागणी अविनाश पाटील या हॉल मालकाने केली आहे.

लॉकडाऊनमुळे तीन वेळा लग्न पुढे ढकलले

लॉकडाऊनमुळे तीन वेळा लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. आता एप्रिलच्या २३ तारखेला लग्न ठरवण्यात आले होते. त्यामुळे आता कितीवेळा लग्न पुढे ढकलावे, असा प्रश्न पडला आहे. – रोहिणी हिवरकर; वधू

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -