घरताज्या घडामोडीमुंबईत येणार्‍या महिलांसाठी ताडदेवला ५०० खोल्यांचे सुसज्ज वसतिगृह

मुंबईत येणार्‍या महिलांसाठी ताडदेवला ५०० खोल्यांचे सुसज्ज वसतिगृह

Subscribe

विविध कामांनिमित्त मुंबई आणि उपनगरात येणार्‍या राज्यातील महिलांसाठी म्हाडातर्फे सुसज्ज वसतिगृह उभारण्याची घोषणा गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून मुंबईत काम करण्यासाठी आणि करिअर घडविण्यासाठी येणार्‍या महिलांसाठी हा खास उपक्रम सरकारने हाती घेतला असून, मुंबईत ताडदेव येथे ५०० खोल्यांचे हे वसतिगृह असेल. आव्हाड मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यातील असंख्य महिला मुंबईत अनेक स्वप्न घेऊन येत असतात. कामानिमित्त आणि साधारण व्यवसायानिमित्त असंख्य महिला राज्यातील विविध भागांतून मुंबईत येतात. त्यांना राहण्याची व्यवस्था नसते. यात त्यांचे अतिशय हाल होतात. या महिलांना मुंबईत निवार्‍यासाठी हक्काचे स्थान असावे यासाठी म्हाडाच्यावतीने हा प्रकल्प हाती घेतला जात असल्याचे आव्हाड म्हणाले. ताडदेव येथे ५०० खोल्यांचे हे वसतिगृह असेल. त्यात विविध सुविधा दिल्या जाणार आहेत.

- Advertisement -

या वसतिगृहातील एक हजार महिलांची राहण्याची व्यवस्था होणार आहे, असे आव्हाड यांनी सांगितले. या प्रकल्पाचे काम लवकरच हाती घेतले जाणार असून पुढील एक ते दीड वर्षात वसतिगृहाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला.

मुंबईत काम करणार्‍या माताभगिनींसाठी राहण्याची व्यवस्था नसते. त्यांना वसई-विरार किंवा डोंबिवली पलिकडे जागा शोधावी लागते. त्यामुळे मुंबईत महिलांना राहण्याची सोय व्हावी यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचना केल्या होत्या. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत सूचना केली होती, असेही आव्हाड म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -