घरमुंबईतब्बल १६ तासानंतर पश्चिम रेल्वे रुळावर

तब्बल १६ तासानंतर पश्चिम रेल्वे रुळावर

Subscribe

अंधेरी पुल दुर्घटनेनंतर तब्बल १६ तासांनी मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणारी पश्चिम रेल्वेची लोकल सुरळीत धावली. रेल्वे सुरळीत धावू लागल्याने रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

तब्बल सोळा तासांनी पश्चिम रेल्वेची वाहतूक रूळावर आल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता अंधेरीतील गोखले पूल कोसळल्याने पश्चिम रेल्वे ठप्प झाली होती. अखेर १६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर मध्यरात्री १२च्या दरम्यान पश्चिम रेल्वे पूर्वपदावर आली. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जलद मार्ग सुरू झाला त्यानंतर मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास चर्चगेटच्या दिशेने अप धीमा मार्ग पूर्ववत करण्यात आला. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळला. त्यानंतर मुंबईची लाईफलाईन ठप्प झाली. परिणामी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर हाल झाले. त्याचा ताण रस्ते वाहतुकीवर आल्याने रस्त्यांवर देखील वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले. या दुर्घटनेमध्ये ५ जण जखमी देखील झाले आहेत. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे घटनास्थळी काम करताना अडथळे निर्माण होत होते. पण, तब्बल १६ तासांच्या प्रयत्नानंतर पश्चिम रेल्वे सुरळीत सुरू झाली आहे.

…अन् लाईफलाईनला लागला ब्रेक

सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम होता. मंगळवारची सकाळ झाली ती मुसळधार पाऊस आणि ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या बातमीने. अशातच काहीही करून वेळेवर ऑफिसला पोहोचण्याची मुंबईकरांची गडबड. पण लाईफलाईनला ब्रेक लागला तो पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळील गोखले पुलाचा काही भाग कोसळल्याच्या बातमीने. सकाळी ७.३० वाजता गोखले पुलाचा काही भाग कोसळला आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या दुर्घटनेमध्ये ५ जण जखमी झाले. विरार ते चर्चगेट दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईकरांनी मोर्चा वळवला तो बस, रिक्षा आणि टॅक्सीकडे! पण ताण वाढल्याने रस्त्यावर देखील वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला. शिवाय पावसाचा जोर कायम असल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र होते.

- Advertisement -

मुंबई पालिका आणि रेल्वेचे एकमेकांकडे बोट

अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर पालिका आणि रेल्वेने एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकायला सुरूवात केली. पुलाच्या देखरेखीची जबाबदारी रेल्वेची असल्याची सांगत पालिकेने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला तर रेल्वेने देखील मुंबई पालिकेकडे बोट दाखवले.

रेल्वे मंत्र्यांची घटनास्थळी भेट

अंधेरीतील पुल दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ४४५ पुलांच्या ऑडिटची घोषणा केली. शिवाय प्रसंगावधान दाखवणाऱ्या मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना ५ लाख रूपयांचे बक्षिस जाहीर केले. तर जखमींना प्रत्येकी १ लाखाच्या मदतीची घोषणा करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -