राज्यपाल नियुक्त आमदारांचे काय झाले ?

ठाकरे सरकारची तीनदा विचारणा

governor of maharashtra

राज्यपाल नियुक्त १२ जणांच्या नावाच्या सरकारने केलेल्या शिफारशीचे काय झाले याविषयी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या तीनवेळच्या विचारणेनंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काहीच उत्तर दिले नाही. सरकारने शिफारस केलेल्या नावांमधील व्यक्तींची आमदार म्हणून राज्यपालांनी अजून नियुक्ती न केल्याने सरकारने तिसर्‍यांदा विचारणा केली होती.

राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत महाविकासआघाडी सरकारकडून राज्यपालांना दोन वेळा विचारणा करण्यात आली आहे. ही यादी राज्यपालांना सुपूर्द करून काही महिने उलटले आहेत. मात्र, तरीही राज्यपालांनी या यादीवर सही केलेली नाही. त्यामुळे या यादीवर नेमका कधी शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तयार आहे.

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे सुपूर्द करण्यात आली. मात्र, अद्याप यावर राज्यपालांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राज्यपाल कोश्यारी हे महाविकास आघाडी सरकारला अजिबात किंमत देत नसल्याची बाब यातून उघड झाली असून, सरकारच्या शिफारशींना फारसे महत्व राजभवनावर दिले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.