ठाण्यातील मोफत उपचार देणारी रुग्णालये कोणती? नावे जाहीर करा!

राज्यातील १ हजार रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. मात्र, अद्याप नागरिकांना ठाण्यातील रुग्णालयांची नावे समजलेली नाहीत.

राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत सर्व कोरोना रूग्णावर मोफत उपचार करणाचा अध्यादेश जारी केला आहे. राज्यातील १ हजार रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. मात्र, अद्याप नागरिकांना ठाण्यातील रुग्णालयांची नावे समजलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे. ठाण्यातील रुग्णालयांची नावे आणि संपर्क अधिकाऱ्यांची नावे व दूरध्वनी क्रमांक जाहीर करावा, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ठाणे शहरातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असून, उपचारांसाठी रुग्णांना रुग्णालयामध्ये जागा नसल्याचे उघड होत आहे. त्यातच महागड्या उपचारांचेही नागरिकांवर सावट आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने कोरोनाचे उपचार होणाऱ्या रुग्णालयांमधील दर निश्चित केले होते. मात्र, त्याला रुग्णालयाकडून जुमानले जात नसल्याचे चित्र आहे, याकडे नगरसेवक डुंबरे यांनी पत्रातून लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २३ मे रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयाद्वारे कोरोनाच्या आजारावर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या योजनेची ठाण्यातील नागरिकांना संपूर्ण माहिती मिळण्याची गरज आहे.

राज्यातील १ हजार रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.  मात्र, अद्याप नागरिकांना ठाण्यातील रुग्णालयांची नावे समजलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्याचबरोबर या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याचे नावही जाहीर करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत नागरिकांना माहिती मिळू शकेल, असे डुंबरे यांनी पत्रात म्हटले आहे.