नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आहेत तरी कोण?

हेमंत नगराळे

सचिन वाझे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना चांगलेच भोवले आहे. वाझें प्रकरणी परमबीर सिंह यांची उचलबांगडी करत आता त्याजागी हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. यापूर्वी हेमंत नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. तर रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर यांची उचलबांगडी करत त्यांचा गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर संजय पांडे या सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे महाराष्ट्र राज्य सुरुक्षा मंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, ज्या हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. ते कोण आहेत? त्यांची कारकिर्द काय आहे जाणून घेऊया.

कोण आहेत हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी सहावीपर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतले. नगराळे हे मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. तसेच त्यांनी फायनान्स मॅनेजमेंट विषयात आपले मास्टर्स केलं. तसेच ते १९८७च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. नगराळे यांनी आयपीएस अधिकारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांसह दिल्लीतही आपली सेवा बजावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती. तर १९९२ ते १९९४ या काळात ते सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त होते. १९९२च्या दंगलीनंतर सोलापूरमधील कायदा व सुव्यस्थेची स्थिती उत्तमरित्या हाताळली आहे. १९९४ ते १९९६ या काळात दाभोळ ऊर्जा कंपनीशी संबंधिक भूसंपादनाचं प्रकरण त्यांनी हाताळलं. १९९६ ते १९९८ मध्ये पोलीस अधीक्षक, सीआयडी आणि गुन्हे शाखेत विविध पदांवर असताना त्यांनी राज्यव्यापी असलेल्या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी केली. १९९८ ते २००२ या काळात नगराळे यांनी सीबीआयसाठी मुंबई आणि दिल्लीतही आपली सेवा बजावली आहे. सीबीआयच्या सेवेत असताना बँक ऑफ इंडियातील केतन पारेख घोटाळा, माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, हर्षद मेहताचा घोटाळा अशा अनेक प्रकरणांच्या चौकशीत महत्त्वाची भूमिका बजावली आणि आज अखेर त्यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली


हेही वाचा – मोठी बातमी ! मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे, परमबीर सिंह यांची उचलबांगडी