घरमुंबईकाँग्रेस का म्हणते ‘एकला चलो रे’?

काँग्रेस का म्हणते ‘एकला चलो रे’?

Subscribe

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विविध बैठकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढण्याचा आग्रह पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून धरला गेला. त्या अनुषंगाने नेतेही कामाला लागले आहेत. तसे पाहता राज्यात काँग्रेसची ताकद अजिबातच वाढलेली नाही. असे असतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादीची साथ सोडण्यासाठी काँग्रेस का आतुर झालाय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो. या ‘एकला चलो रे’च्या तत्वाला अनेक कंगोरे आहेत.

नवी मुंबई, वसई-विरार आणि औरंगाबाद महापालिकेची निवडणूक येत्या काही दिवसांत होईल. त्यानंतर वर्षभरात मुंबई आणि नाशिक महापालिकेची निवडणूक होईल. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. युत्या आणि आघाड्यांविषयी देखील हालचाली सुरु झाल्याने येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलेले दिसेल. राज्यात राबवलेला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आता स्थानिक स्वराज्य संस्थांतही राबवण्याचे मनसुबे शिवसेना आणि काँग्रेसचे पदाधिकारी रचत असताना काँग्रेसने मात्र ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत निवडणुकांआधीच बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विविध बैठकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढण्याचा आग्रह पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून धरला गेला. त्या अनुषंगाने नेतेही कामाला लागले आहेत. तसे पाहता राज्यात काँग्रेसची ताकद अजिबातच वाढलेली नाही. असे असतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादीची साथ सोडण्यासाठी काँग्रेस का आतुर झालाय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो. या ‘एकला चलो रे’च्या तत्वाला अनेक कंगोरे आहेत.

नेहमीच सत्तेत राहण्याची सवय लागलेल्या या पक्षाला सत्तेबाहेरुन काम करणे अवघड जात आहे. त्यामुळे हा पक्ष गलितगात्र झाल्यासारखा झाला आहे. देशातील १३५ वर्षे जुना पक्ष असलेला काँग्रेस आज मात्र सर्वत्र पराभव स्वीकारत चालला आहे. काँग्रेससारख्या पक्षाचे असे हाल होणे हे भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. संसदीय लोकशाहीत प्रबळ विरोधी पक्षाची गरज सर्वांनीच मान्य केली आहे. अशा स्थितीत काँग्रेसचे पतन हे एका पक्षाचे पतन न समजता ‘भारतीय लोकशाहीसमोरील नवी चिंता’ अशा प्रकारे त्याकडे पाहिले पाहिजे. काँग्रेसचा र्‍हास म्हणजेच भाजपचा विकास असे स्पष्ट समीकरण झाले आहे.

- Advertisement -

आज राज्याच्या सत्ताकारणात जरी काँग्रेसला सहभागी करुन घेण्यात आले असले तरीही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसच्या वाट्याला ‘मान-सन्मान’ तसा कमीच आला आहे. महत्वाच्या पदांवर काँग्रेसचे मंत्री नाहीत. ज्या पदांवर आहेत, त्यांना धड काम करू दिले जात नाही. त्यांची बाजू घेण्यासाठीदेखील दोन्ही सहकारी पक्षांतील खंदे मंत्री पुढे येताना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेत तरी अशी अवहेलना नको म्हणून आता काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याची भाषा करीत आहे. याशिवाय आघाड्यांमध्ये सहभागी होऊन स्वत:च्याच पायावर धोंडा पाडण्याचा प्रकार होत असल्याचे एव्हाना काँग्रेसींना समजलेले दिसते. अन्य पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवल्यानंतर पुढील पाच वर्षे संघटनवाढीवर प्रतिकूल परिणाम होताना दिसतो. सोबत घेतलेल्या पक्षांचा विकास होतो; मात्र मुख्य पक्षाचा विकासदर घटतो हा आजवरचा अनुभव आहे. त्याची प्रचिती काँग्रेसलादेखील आली आहे. विशेषत: विभिन्न विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेतल्यावर पक्षाच्या ध्येय-धोरणांशीही तडजोड करावी लागल्याचा अनुभव आहे. राज्यात शिवसेनेबरोबर काम करताना अनेक मुद्यांबाबतीत काँग्रेसची मुस्कटदाबीच होत आहे. हिंदुत्वाच्या मुद्यांवर एखादा निर्णय घेतला जात असेल तेव्हा लटका विरोध करण्यापलीकडे काँग्रेसींच्या हाती फार काही उरत नाही. त्यातून धर्मनिरपेक्षतेच्या धोरणालाच तडा जातो. हे वारंवार घडते तेव्हा धर्मनिरपेक्ष तत्वाला मानणारा मतदारवर्गही काँग्रेसपासून दूर जातो.

शिवाय निवडणुकीच्या प्रचारातही हिंदुत्ववाद आणि धर्मनिरपेक्षता या परस्पर विरोधी बाबींची सांगड घालता येत नाही. त्यामुळे अशा ‘अनैसर्गिक’ आघाड्यांमुळे पक्षाला फटकाच बसतो हे काँग्रेसींनी आता चांगलेच जाणले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर आघाडी केल्यास त्यांची धर्मनिरपेक्ष मते पूर्णत: आपल्याकडे येतील अशीही भोळी आशा काँग्रेसजनांना आहे. मागासवर्गीय आणि मुस्लीम मते आपल्या हक्काची आहेत, असा गैरसमज करुन घेतलेल्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी या वर्गासाठी ठोस असे फार काही केलेले नाही ही बाब आता सर्वांच्याच लक्षात आली आहे. वंचित बहुजन आघाडी सारख्यांनी काँग्रेसच्या चाकातील हवा काढण्याचा प्रयत्न केलाय. ढासळलेली ही परिस्थिती फार काळ टिकून राहणे पक्षाच्या भविष्यासाठी योग्य नाही. त्यामुळे काँग्रेसने आता सर्वत्र संघटन वाढीचा चंग बांधला आहे. अर्थात अशा प्रकारच्या बेटक्या निवडणुकांआधी फुगवण्याची सवय स्थानिक नेतृत्वालाही झाली आहे. त्यातून फार काही साध्य होत नाही यावर त्यांचा ठाम विश्वास असल्याने पक्षासाठी आता काही न केलेलेच बरे या भूमिकेत अनेक मंडळी आलेली दिसते.

- Advertisement -

कोणत्याही राजकीय पक्षाची ओळख त्याच्या विशिष्ट राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विचारसरणीतून होत असते. काँग्रेसची विचारसरणी बंदिस्त चौकटीतली नव्हती. सातत्य कायम ठेवून बदल स्वीकारणे हा या विचारसरणीचा आत्मा होता. अनेक समरप्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती त्यामुळेच या पक्षाला वेळोवेळी प्राप्त झाली. वैचारिक तटस्थता किंवा राजकीय साचलेपण ही काही काँग्रेस पक्षाची ओळख यापूर्वी कधीही नव्हती. परस्परांशी कसलेही साधर्म्य नाही असे वैविध्य एका माळेत गुंफून आधुनिक भारताची उभारणी करण्याची भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीत स्थापनेपासून होती. सर्वधर्मियांना बरोबर घ्यायचे, सर्वांना समान न्याय, समान संधी, मिळवून द्यायची. भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक भिन्नतेत जराही भेदभाव न करता सर्वांचा सर्व वैशिष्ठ्यांसह सन्मान करायचा हा काँग्रेसचा मूलभूत विचार होता. पण या विचारांशी प्रतारणा करण्याचे काम याच पक्षातील नेत्यांनी केलेले दिसते. आज स्थानिक पातळीवर परिस्थिती बिकट आहे.

प्रामाणिक कार्यकर्त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीचे पक्षाकडे धड रेकॉर्ड नसते. सत्ताधार्‍यांवर मुद्देसूदपणे संयत भाषेत चढाई करू शकणार्‍या वक्त्यांची कमतरता आहे. इतकेच नाही तर स्थानिक पातळीवर पक्षाची धुरा ज्या नेत्यांवर सोपवण्यात आलीय, ते अजगरासारखे झोपून आहेत. संघटन वाढीसाठी फारसा प्रयत्नच होताना दिसत नाही. विरोधी पक्ष रोजच्या रोज असंख्य मुद्दे हाती देत आहे. बेरोजगारीपासून महागाईपर्यंत आणि धर्मवादापासून ते राष्ट्रवादापर्यंतच्या अनेक मुद्यांवर पेटून उठणे गरजेचे आहे. पण केवळ दोन-पाच डोकी सोबत घेऊन आंदोलनांचा देखावा करीत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून होत आहे. हे ‘नाटक’ जनतेच्याही लक्षात आल्यामुळे या पक्षाला जनाधार राहिलेला दिसत नाही. त्यातून काँग्रेसची अधोगती होत आहे. पक्षाची दयनीय अवस्था बघता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षांतर्गत फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे महसूलमंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशी तीन महत्त्वाची पदे बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहेत. ‘एक व्यक्ती एक पद’ या न्यायतत्वाला धरुन बाळासाहेब थोरात लवकरच महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची शक्यता आहे.

खासदार राजीव सातव तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले मंत्री विजय वडेट्टीवार आणि सुनील केदार या तिघांपैकी एखादी व्यक्ती महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती झाली. आगामी मुंबई मनपाची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून हा निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त मराठी मते मिळवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती केली. चरण सिंग सप्रा मुंबई काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष झाले. मोहम्मद आरिफ नसीम खान यांना मुंबई काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख करण्यात आले. डॉ. अमरजीत सिंह मनहास यांची मुंबई काँग्रेसच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. सुरेश शेट्टी यांना मुंबई काँग्रेसच्या जाहीरनामा आणि प्रकाशन समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग आता काँग्रेसने पुन्हा एकदा करण्यास सुरुवात केल्याचे यावरुन स्पष्ट होते.

काँग्रेस का म्हणते ‘एकला चलो रे’?
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -