घरमुंबईफडणवीस-मिंधे सरकार आट्या-पाट्या का खेळत आहे, उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल

फडणवीस-मिंधे सरकार आट्या-पाट्या का खेळत आहे, उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल

Subscribe

मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आजपासून (मंगळवार, १४ मार्च) राज्यातील 18 लाख शासकीय कर्मचारी, शिक्षक, परिचारिका संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विरोधकांनी या मुद्यावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे.

जे हक्काचे आहे ते कर्मचाऱ्यांना मिळालेच पाहिजे – उद्धव ठाकरे
महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आज जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आंदोलन केले आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका ट्विटरच्या माध्यमातून मांडली आहे. उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे की, जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. सरकारला टाळे ठोकले आहे. सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी फडणवीस आणि शिंदे सरकारला टोला लगावला आहे, ते म्हणाले, ‘इतकी मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी.’

- Advertisement -

मिंधे सरकार आट्या-पाट्या का खेळत आहे?
राज्यातील लाखो कर्मचारी आजपासून संपावर आहेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे ठाकरेंनी म्हटलं आहे. देशातील काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. मग फडणवीस आणि मिंधे सरकार याबाबत आट्या पाट्या का खेळत आहे? जे हक्काचे आहे ते कर्मचाऱ्यांना मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या काळात जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली होती. बंद करतेवेळस वंचित बहुजन आघाडीने भाजपाला सांगितले होते की, याचे परिणाम २० वर्षांनंतर आपल्याला दिसू लागतील आणि याचे परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे, असे वक्तव्य वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन मिळावी यासाठी आंदोलन सुरू केले आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे. पेन्शन चालू झालीच पाहिजे ही आमची सुद्धा मागणी आहे. तसेच काँग्रेस पक्षानेही कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिल्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाचे अभिनंदन करतो, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची नुकतीच युती झाली आहे. या दोन्ही पक्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

काँग्रेसशासित राज्यात जुनी पेन्शन योजना
राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
जुन्या पेन्शन अंतर्गत कर्मचाऱ्यांना ठराविक रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते. एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने 1 एप्रिल 2004 पासून जुनी पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -