खारघरमधील मृत्यूप्रकरणी सरकारकडून अद्याप कोणतीच कारवाई का नाही; काँग्रेसचा सवाल

मुंबई : प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खारघरमध्ये मृत्यू प्रकरणी सरकारकडून अद्याप कोणतीच कारवाई का नाही? असा प्रश्न उपस्थित करत सरकारच्या कृतीचा निषेध करणारा ठराव मंजरू करण्यात आला. यावेळी देशातील तसेच महाराष्ट्रातील विविध ठराव मंजूर करण्यात आले.

शिंदे-फडणवीस सरकारने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर केला. हा पुरस्कार प्रदान सोहळा खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉ. आप्पासाहेब धर्माधिकार यांना हा पुरस्कार देण्यात आला. मात्र भर दुपारी हा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे 14 जणांचा उष्माघाताने बळी गेला, तर उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर राजकारण चांगलेच तापले होते. विरोधकांनी या घटनेप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. या प्रकरणी प्रदेश काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत विषय मांडण्यात आला. बैठकीत म्हटले की,  खारघर प्रकरणात उन्हात तडफडून मृत्यू झाल्याप्रकरणी सरकारने अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. सरकारच्या अनास्थेचे हे बळी आहेत. सरकारने अजून गुन्हे दाखल केले नाहीत. त्यामुळे सरकारच्या या कृतीचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

कार्यकारिणीच्या बैठकीत कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमतांनी विजयी केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरमय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला, तर कोऱ्हाडी उर्जा प्रकल्पाला विरोध होत आहे. त्यासंदर्भात जनसुनावणी दुपारी १२.३० वाजता ठेवण्यात आली आहे. सरकारने दुपारी कार्यक्रम घेऊ नये असा कायदा केला असताना सरकारच कायदा मोडत आहे. ही जनसुनावणी संध्याकाळी घेण्यासाठी ठराव मांडण्यात आला.

बैठकीत ‘या’ प्रकरणी निषेधाचा ठराव
एमपीएसी सातत्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत आहे. मध्यंतरी मुलांना आंदोलनही करावे लागले. आताही टंकलेखन परिक्षेत आयोगाने गोंधळ घातला. या सर्व प्रकरणामागे कोण आहे याचा चौकशी झाली पाहिजे. तसेच राज्यातून महिला व मुली मोठ्या संख्येने बेपत्ता होत आहेत, परंतु पोलीस प्रशासन मात्र त्यावर कारवाई करत नाही आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटू आंदोलन करत आहेत, या आंदोलनाला पाठिंबा देणारा ठराव करण्य़ात आला तसेच पंतप्रधान या महिला कुस्तीपटूंशी चर्चा करण्यासही तरया नाही. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप सरकारी मदत पोहचलेली नाही, शेतकऱ्यांना लवकर मदत मिळाली पाहिजे, पण सरकार ती देत नाही. त्यामुळे वरील सर्व मुद्दांवर निषेधाचा ठराव मांडण्यात आला.

दरम्यान, प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे. माजी मंत्री नीतीन राऊत, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, हुसेन दलवाई, खासदार कुमार केतकर, AICC चे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.