Booster Dose: मुंबईकरांना २७५ सेंटरवर मिळणार बुस्टर डोस

will get booster dose at 275 centers in mumbai
Booster Dose: मुंबईकरांना २७५ सेंटरवर मिळणार बुस्टर डोस

केंद्र सरकारच्या आदेशाने मुंबईकरांना पालिका आणि खासगी अशा २७५ सेंटरवर येत्या सोमवारपासून बुस्टर डोस देण्यात येणार आहे. किमान ९ महिने पूर्ण झालेल्या पात्र लाभार्थ्यांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. १८ वर्षांवरील ९२ लाख ३६ हजार पात्र लाभार्थ्यांना बुस्टर डोसचा लाभ घेता येणार आहे. पालिकेने त्यासाठी खास नियोजन केले आहे. यासंदर्भातील माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

महापालिकेने लसीचे दोन डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील सर्व लाभार्थी यांना ‘प्रिकॉशन डोस’ देण्यात येत आहेत. पालिकेने १६ जानेवारीपासून कोविडला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेतली. पालिका आरोग्य विभागाने १८ वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण केले आहे.

मात्र लसीचा पहिला, दुसरा डोस घेतल्यानंतरही काही लोकांना कोविडची बाधा झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. शासनाने आणि पालिका प्रशासनाने लसीचे दोन डोस घेऊन ९ महिने झालेल्या लाभार्थ्यांना ‘प्रिकॉशन डोस’ दिला जाणार आहे. १८ वर्षांवरील पात्र अशा सर्व लाभार्थ्यांना ‘प्रिकॉशन डोस’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ५ हजार कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देऊन लसीकरण केले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मात्र यासंदर्भात केंद्र सरकारकडून नियमावली प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, ‘प्रिकॉशन डोस’ देण्यासाठी पालिका प्रशासन सोशल मीडियाच्या, वृत्तपत्रे आदींच्या माध्यमातून जनजागृती करणार आहे.


हेही वाचा – Booster Dose: देशात आता १८ वर्षांवरील वयोगटाला १० एप्रिलपासून दिला जाणार बूस्टर डोस