(Women in Afghanistan) काबूल : अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे महिलांबाबत कायमच कडक धोरण राहिले आहे. आता तालिबानकडून पुन्हा एकदा महिलांसाठी एक फर्मान जारी करण्यात आले आहे. त्यानुसार निवासी इमारतींमध्ये खिडक्या तयार करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. (Taliban bans windows overlooking women’s areas)
नवीन इमारतींमध्ये शेजारच्या घराचे अंगण, स्वयंपाकघर, शेजारील विहीर आणि सामान्यतः महिलांचा वावर असलेली इतर ठिकाणे दृष्टिपथात येतील अशा खिडक्या वास्तूंना नसाव्यात, असा आदेश जारी करण्यात आल्याची माहिती तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने शनिवारी उशिरा दिली. महापालिकेचे अधिकारी आणि इतर संबंधित विभागांना बांधकाम साइटवर लक्ष ठेवावे लागेल. शेजाऱ्यांच्या घरात डोकावणे शक्य होणार नाही, अशी व्यवस्था होते आहे का, याची खातरजमा या अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे.
BREAKING:
Taliban leader Hibatullah has ordered a ban on residential windows that face neighboring homes, saying it is to protect the privacy of women. pic.twitter.com/CFnitXV5TF
— Current Report (@Currentreport1) December 29, 2024
महिलांना स्वयंपाकघर, अंगण किंवा विहिरीतून पाणी आणताना पाहून अश्लील कृतींना प्रोत्साहन मिळू शकते, असे कारण सरकारचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे. महिला दिसतील अशा खिडक्या घरांना असतील तर मालकांना तिथे भिंत बांधण्यासाठी किंवा ती अन्य प्रकारे बंद करण्यास सांगितले जाणार आहे, असेही या आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा – NRI Voting : लोकसभेतील मतदानाबाबत अनिवासी भारतीय उदासीन, महाराष्ट्राची आकडेवारी काय सांगते?
ऑगस्ट 2021मध्ये तालिबान सत्तेत परत आल्यापासून, त्यांनी महिलांना हळूहळू सार्वजनिक ठिकाणांवरून हटविण्यास सुरुवात केली आहे. याबद्दल तालिबान सरकार करीत असलेल्या या ‘लिंगभेदा’च्या भूमिकेचा युनायटेड नेशन्सने निषेध केला आहे. तालिबान अधिकाऱ्यांनी मुली आणि महिलांच्या प्राथमिक शिक्षणानंतर पुढे शिकण्यावर बंदी घातली आहे. तसेच, नोकरी-व्यवसाय करण्याबरोबरच, उद्याने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यास मनाई केली आहे.
तालिबान सरकारच्या इस्लामिक कायद्याच्या कठोर अंमलबजावणीचा एक भाग म्हणून अलीकडेच स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी गाणे म्हणण्यास किंवा कविता ऐकण्यासही प्रतिबंध घालण्यात आले आहेत. काही स्थानिक रेडिओ आणि दूरचित्रवाणी केंद्रांनीही महिलांच्या कार्यक्रमांचे प्रसारण बंद केले आहे. (Women in Afghanistan : Taliban bans windows overlooking women’s areas)
हेही वाचा – Dr. Manmohan Singh : काँग्रेसने अदानींकडे विनंती अर्ज करायला पाहिजे का? ठाकरे गटाचा खोचक प्रश्न