Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई हँकॉक पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे काम पूर्ण; पुनर्बांधणीला येणार वेग

हँकॉक पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे काम पूर्ण; पुनर्बांधणीला येणार वेग

हँकॉक पुलाला धोकादायक ठरविण्यात आल्याने या पुलाचे पाडकाम ९ जानेवारी २०१६ रोजी करण्यात आले होते.

Related Story

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या भायखळा-सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान माझगाव व डोंगरी यांना जोडणाऱ्या हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीतील महत्त्वाचा टप्पा असलेले दुसरा गर्डर टाकण्याचे आव्हानात्मक काम रविवारी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे आता या पुलाच्या पुनर्बांधणीला चांगलाच वेग येणार आहे. या पुलाचे २०१६ पासून रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अथक प्रयत्न केले. आजही या पुलाचे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी ते नियमित आढावा घेऊन कामासाठी पाठपुरावा करीत आहेत. मुंबईतील रेल्वे मार्गावरील वाहतूक पुलांपैकी एक असा हँकॉक हा १३५ वर्षे जुना पूल आहे.

मुंबईत धोकादायक पुलांची पाहणी करण्यात आली. त्यावेळी हँकॉक पुलाला धोकादायक ठरविण्यात आल्याने या पुलाचे पाडकाम ९ जानेवारी २०१६ रोजी करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुलाच्या कामाचे प्रकरण दोन वर्षे कोर्टकचेरीमुळे रखडले. २०१८ मधेय पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मे. साई प्रोजेक्ट या कंत्राटदाराला पुलाचे काम ५१ कोटी रुपयांत देण्यात आले. तर पालिकेने पुलाच्या कामासाठी ओव्हरहेड वायर स्थलांतरित करणे व इतर कामांसाठी ३९ कोटी रुपये मोजले. तसेच, या कामाच्या समन्वयक मे. राईट्सला ३.१७ कोटी रुपये मोजले आहेत.

- Advertisement -

या पुलाचे काम १२ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोर्टकचेरी पुलाच्या कामात बाधक ठरणाऱ्या झोपड्या हटविणे, रेल्वेच्या परवानग्या आदी कारणांमुळे हे काम रखडले. जुलै २०२० मध्येया पुलावर पहिला गर्डर बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. आता दुसरा गर्डर (६७५ मेट्रिक टन वजनाचा) १० महिन्यांनी म्हणजे ६ जून २०२१ रोजी बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. दोन गर्डर टाकण्याचे महत्त्वाचे काम झाल्याने आता उर्वरित काम जलद गतीने मार्गी लावून  ७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य गाठण्यात येणार आहे.

माझगाव आणि डोंगरी यांना जोडणारा हँकॉक पूल हा वाहतुकीसाठी, पादचाऱ्यांसाठी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरतो. मुंबई महापालिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारासू यांच्या मार्गदर्शनाने उपआयुक्त (पायाभूत सुविधा) तथा प्रमुख अभियंता (रस्ते व पूल) राजेंद्रकुमार तळकर आणि त्यांचे सहकारी, अधिकारी हे या पुलाच्या पुनर्बांधणीची कार्यवाही करत आहेत. दुसरा गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने पुलाची पुनर्बांधणी आणखी जलद गतीने करता येणार आहे. या पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम, उपलब्ध रस्त्याची रुंदी तसेच आवश्यक रुंदीकरण आणि बाधित कामांचे निष्कासन लवकरच हाती घेतले जाणार आहे.

- Advertisement -