घरCORONA UPDATEहँकॉक पुलाचे काम मार्च २०२१ला होणार पूर्ण

हँकॉक पुलाचे काम मार्च २०२१ला होणार पूर्ण

Subscribe

रेल्वे मार्गाच्यावरील बाजुने हे गर्डर पुढे ढकलण्यात आले असून मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या पुलाचे काम मार्च २०२१पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दक्षिण मुंबईतील बहुचर्चित रखडलेल्या हँकॉक पुलाचे रेल्वेमार्गावर गर्डर टाकण्याच्या कामाला शनिवारी सुरुवात झाली आहे. रेल्वे मार्गाच्यावरील बाजुने हे गर्डर पुढे ढकलण्यात आले असून मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या पुलाचे काम मार्च २०२१पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या ‘बी’ विभागातील माझगावमधील शिवदास चापसी रोडवर असलेल्या हँकॉक पुलाचे बांधकाम धोकादायक ठरल्याने रेल्वेच्यावतीने ते तोडण्यात आले होते. त्यानंतर या पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. परंतु या पुलाच्या बांधकामासाठी नेमण्यात आलेला कंत्राटदार काळ्या यादीतील कंपनी असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार ते कंत्राट रद्द करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने नव्याने निविदा मागवून या पुलाच्या बांधकामासाठी २० फेब्रुवारी २०१८ रोजी १९ महिन्यात काम पूर्ण करण्यासाठी साई प्रोजेक्ट्स(मुंबई) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली. या कंपनीला विविध करांसह ५१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. परंतु रेल्वे प्राधिकरणाने आयआयटीच्या मार्गदर्शक तत्वातील आय.एस.कोडप्रमाणे गर्डर्सचे डिझाईन बदलण्याची सूचना केली. ज्यामुळे या पुलाच्या कामाची कंत्राट किंमत २५ कोटी ७१ लाख रुपयांनी वाढत एकूण कंत्राट किंमत ७७ कोटी एवढी झाली.

- Advertisement -

या पुलाचे रेल्वे मार्गावर गर्डर टाकण्याचे काम मागील चार दिवसांपूर्वी हाती घेण्यात आले होते. परंतु रेल्वे व महापालिका यांच्यात करारपत्र नसल्याने हे काम थांबवण्यात आले होते. त्यानंतर पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धावपळ करत  विधी अधिकाऱ्यांच्या मदतीने करारपत्राचा मसुदा अंतिम करून दिला. त्यानंतर शनिवारी रेल्वे मार्गावरील गर्डर टाकण्याचे कामाला सुरुवात करण्यात आली. माजी नगरसेवक मनोज जामसूतकर यांनी या  पुलाची पाहणी करून  रखडलेल्या कामाची बाब समोर आणली होती. त्यानंतर प्रशासनाने अधिक हालचाली सुरु केल्या.

पुल विभागाचे प्रमुख अभियंता राजेंद्रकुमार तळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हँकॉक पुलाचे काम सुरुच आहे. या पुलाच्या उभारणीचे काम यापूर्वी रस्त्यांवर सुरुच होते. परंतु शनिवारी या पुलाचे गर्डर रस्त्यांवरुन रेल्वे मार्गाच्या दिशेने सरकवण्यात आले आहे. हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जात असून येत्या मार्च २०२१ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र रेल्वे व महापालिका यांच्यात योग्यप्रकारे समन्वय असून त्यामुळेच नियोजित वेळेत हे काम पूर्ण होईल, असेल त्यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -