Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी world environment day: मुंबईत २५ हजार वृक्षांची लागवड करणार - महापौर

world environment day: मुंबईत २५ हजार वृक्षांची लागवड करणार – महापौर

जमिनीत खोलवर मुळं घट्ट पकडून ठेवणाऱ्या देशी वाणांचे वृक्ष लावण्यावर अधिक भर देणार असे महापौर म्हणाल्या.

Related Story

- Advertisement -

जमिनीमध्ये खोलवर मुळं घट्ट पकडून ठेवणाऱ्या देशी वाणांचे वृक्ष मुंबईमध्ये लावण्यावर यावर्षी अधिक भर देणार असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. दरवर्षी ०५ जून हा दिवस संपूर्ण जगात पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भायखळा येथील महापौर निवासस्थानी आज वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या. मुंबईत मियावाकी पद्धत वगळून एकूण २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

याप्रसंगी उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी, महापौर किशोरी पेडणेकर व अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे ) अश्विनी भिडे यांच्या हस्ते सोनचाफा आणि सीता अशोक या वृक्षांचे रोपण करण्यात आले. त्यानंतर, महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महापौर म्हणाल्या की , झाडे, पशुपक्षी ही नैसर्गिक साखळी असून ही साखळी टिकून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांचे रोपण होणे आवश्यक आहे. रस्त्याच्या फुटपाथवर झाडे न लावता महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मोकळी मैदाने आणि टेकड्या याठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. मुंबईसारख्या अधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये वाढत्या शहरी प्रदूषणामुळे विविध प्रकारच्या जीवघेण्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पर्यावरणस्नेही वातावरण निर्मिती करणे, वृक्षारोपण जतन आणि संवर्धनाचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्यामार्फत करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.

- Advertisement -

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांतील १०६८ भूखंडावरील २२९ उद्याने, ४३२ मैदाने, ३१८ मनोरंजन मैदाने तसेच इतर ८९ याठिकाणी (मियावाकी पद्धत वगळून) एकूण २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मुंबईतील हरीत क्षेत्र वाढविण्यासाठी मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण सुरू केले असल्याचे महापौरांनी सांगितले. मियावाकी पद्धतीने ३ लाख ६४ हजार ८१६ इतकी झाडे लावण्याचे प्रस्तावित असून त्यापैकी आजमितीपर्यंत ०२ लाख २१ हजार ४०५ इतके झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात २०१९ च्या वृक्षगणनेनुसार एकूण २९ लाख ,७५ हजार २८३ इतके वृक्ष अस्तित्वात आहे. त्यापैकी रस्त्यालगतची १ लाख ८५ हजार ३३३ झाडे आणि उद्यानातील १ लाख १ हजार ६७ झाडे आहे.

- Advertisement -

अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भिडे म्हणाल्या की, आजपासून महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ झाला असून गतवर्षीप्रमाणे या वर्षीही २५ हजार इतके वृक्षांचे रोपण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चक्रीवादळामुळे विभागनिहाय वृक्षांच्या झालेल्या हानीची नोंद घेऊन या ठिकाणी देशी वाणांचे वृक्ष यावर्षी मोठ्या प्रमाणात लावण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे वृक्षारोपणाचा संपूर्ण कार्यक्रम तयार करण्यात आला असून त्यापद्धतीने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -