घरCORONA UPDATEचर्चा वरळी पॅटर्नची मात्र, बीडीडी चाळीत लोकांचे हाल

चर्चा वरळी पॅटर्नची मात्र, बीडीडी चाळीत लोकांचे हाल

Subscribe

एकीकडे वरळी पॅटर्नची चर्चा केली जात आहे. मात्र, बीडीडी चाळीत लोकांचे खायचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाग्रस्तांच्या यादीत वरळी-प्रभादेवी हा जी-दक्षिण विभाग अजुनही अग्रक्रमावरच असून सर्वाधिक जास्त रुग्ण संख्या आढळून आलेल्या या विभागाने वरळी कोळीवाडा आणि जिजामाता नगर येथे राबवलेली यंत्रणा आणि ५०० खाटांचे एनएसयुआयमध्ये केलेल्या क्वारंटाईनचे कौतुक केंद्रीय पथकाने केल्याचा डंका वाजवला जात आहे. परंतु, मुंबईतील प्रत्येक विभाग कार्यालयांच्यावतीने अशाचपद्धतीने उपाययोजना राबवल्या जात असून जी-दक्षिण विभागाने याची अंमलबजावणी करण्यापूर्वी अन्य विभागांनी याचा अवलंब केला होता. परंतु, वरळी पॅटर्नचा नावाखाली शाबासकीची थाप स्वत:च्या पाठीवरुन मारुन घेण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून सुरु असले तरी वरळीतील प्रत्येक इमारत सध्या सिल असून पैसा हाती असूनही लोकांचे खायचे हाल होत असल्याच्या प्रतिक्रिया लोकांकडून उमटल्या जात आहेत.

प्रत्येक बीडीडी चाळीतील लोकांचे हाल

मुंबईतील जी-दक्षिण विभागातील प्रभादेवी वरळीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६०० च्यावर जाऊन पोहोचली आहे. वरळी कोळीवाडा आणि जिजामाता नगर आणि जनता नगर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आणि हा आकडा झपाट्याने वाढला. सुरुवातीला येथील लोकांना वरळीतील पोद्दार रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आणि त्यानंतर एनएसयुआय ५०० खाटांची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली. मात्र, कोळीवाडा लॉकडाऊन केल्यानंतर येथील प्रत्येक कुटुंबाला घरपोच साहित्य आणि अन्य वाटप करण्यात आले. याशिवाय मुंबईतील २४ विभाग कार्यालयातील प्रत्येकी ५ याप्रमाणे १२० किटकनाशक विभागातील कामगारांची फौज याठिकाणी तैनात करून प्रत्येक घर आणि गल्लीबोळात सॅनिटायझेन करण्यात आले. यासाठी जी-दक्षिण विभाग वगळता मुंबईतील सर्व विभागातील यंत्रणा कामाला लावण्यात आली होती. महापालिका आयुक्तांनी युवराजांच्या मतदार संघाची पूर्णपणे काळजी घेतल्याने एका ठराविक कालावधीनंतर हे प्रमाण आता कमी होताना दिसत आहे. परंतु प्रशासनाने आता हेच रोल मॉडेल तयार करून केंद्रीय पथकाला दाखवले.

- Advertisement -

केंद्रीय पथकाने वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर, धारावी या विभागांचीच पाहणी केली आणि प्रशासनानेही त्यांना हेच विभाग दाखवले. परंतु ज्या विभागांमध्ये सुरुवातीला जास्त रुग्ण होते आणि त्यानंतर त्यांनी ते नियंत्रणात कसे आणले ,अशा विभागांमध्ये केंद्रीय पथकाला नेले नाही किंवा त्यांना कल्पनाही दिली नाही. त्यामुळे सध्या केंद्रीय पथकाला वरळीशिवाय अन्य काहीच माहित नसल्याने याच पॅटर्नची चर्चा असल्याचे काही प्रशासनातील अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांचेही म्हणणे आहे.

घरात काही खायला नाही

विशेष म्हणजे वरळीतील प्रत्येक बी.डी.डी चाळ आता सिल होत असून लोकांना खालीही उतरता येत नाही. हाती पैसा असूनही ना घरात सिलेंडर आणता येत ना त्यांना घरपोच दिला जात. घरात काही खायला नाही. राजकीय पक्षांकडूनही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात असले लहान मुलांसाठी खाऊ बिस्कीटेही आणता येत नाही. अनेक इमारतींमध्ये लहान मुलांचे भुकेपोटी हाल होत आहे. घरात तेल नाही कि साखर. मग जेवण करायचे कसे असा सवाल येथील रहिवाशी करत आहेत. आमदारांनी कोळीवाड्यातील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले असले तरी त्यांचे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे बीडीडी चाळीतील लोकांकडे लक्ष नाही. ज्या पॅटर्नची चर्चा केंद्रीय स्तरावर होत आहे, मग त्याच विभागातील बीडीडी चाळींमध्ये याचा अवलंब का केला जात नाही? असा सवाल मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी केला आहे. आज जिजामाता नगर, मरिअम्मा नगर येथेही कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. हा वरळीचा पॅटर्न तिथे का राबवला जात नाही. एवढेच कशाला लोअर परळमधील काही इमारतीकडेही या लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे धुरी यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत करोनाचे एकाच दिवशी २५ बळी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -