Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी वरळीत लिफ्ट कोसळून चौघांचा मृत्यू, ३ जखमी

वरळीत लिफ्ट कोसळून चौघांचा मृत्यू, ३ जखमी

Related Story

- Advertisement -

मुंबईत पावसाची रिमझीम सुरू असताना शनिवारी सायंकाळच्या सुमारास वरळी येथे एका निर्माणाधिन इमारतीची लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच कामगार गंभीर जखमी झाले. त्यापैकी चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एकजण जखमी अवस्थेत केईएम रुग्णालयात उपचार घेत आहे.

मृत कामगारांमध्ये, अविनाश दास (३५), भरत मंडल (२८), चिन्मय मंडल (३३) व एक ४५ वर्षीय अनोळखी यांचा समावेश आहे. तर लक्ष्मण मंडल (३५) हा गंभीर अवस्थेत केईएम रुग्णालयात उपचार घेत आहे.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, वरळीमधील काही भागात सध्या काही नवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. तर काही इमारतींचा पुनर्विकास होत आहे. या वरळीमधील, शंकरराव पदपथ मार्ग, हनुमान गल्ली, बीडीडी चाळ क्रमांक ११८ व ११९ समोर अंबिका बिल्डर्सकडून एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. जवळजवळ १८-२० मजली इमारत उभारण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पावसात या इमारतीचे काम सुरू असताना इमारतीमध्ये वापरण्यात येणारी लिफ्ट अचानकपणे कोसळली. या लिफ्टच्या दुर्घटनेत पाच कामगार हे मार लागल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नजीकच्या केईएम व नायर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

- Advertisement -

मात्र या पाच गंभीर जखमींपैकी नायर रुग्णालयात नेण्यात आलेल्या भरत मंडल (२८), चिन्मय मंडल (३३) व एक ४५ वर्षीय अनोळखी या तिन्ही कामगारांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी कळवले आहे. तर केईएम रुग्णालयात नेण्यात आलेल्या दोन गंभीर जखमी कामगारांपैकी एक अविनाश दास (३५) या कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी अवस्थेतील लक्ष्मण मंडल (३५) हा केईएम रुग्णालयात उपचार घेत आहे.
ही दुर्घटना का व कशी घडली, त्यास जबाबदार कोण, याप्रकरणी स्थानिक पोलीस चौकशी करीत असल्याचे समजते.

 

- Advertisement -

 


 

- Advertisement -