Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश बृजभूषण सिंह विरोधात आजच दाखल होणार गुन्हा; दिल्ली पोलिसांची सर्वोच्च न्यायालयात माहिती

बृजभूषण सिंह विरोधात आजच दाखल होणार गुन्हा; दिल्ली पोलिसांची सर्वोच्च न्यायालयात माहिती

Subscribe

 

नवी दिल्लीः भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आजच गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात सात महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली आहे. त्यानुसार त्याचा गुन्हा नोंदवण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. हा गुन्हा आजच नोंदवला जाईल, अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. दिल्ली पोलीस आयुक्तांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन तक्रारदार पीडित महिला खेळाडूंना सुरक्षा द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सिंह यांच्याविरोधात खटला दाखल केला जाईल, असे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनीही सांगितले होते. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून कारवाई करावी या मागणीसाठी विनेश फोगाटसह अन्य पैहलवान दिल्लीत आंदोलन करत आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयातही याचिका करण्यात आली आहे.  पीडित महिला पैहलवान यांनी न्यायाधीशांमार्फत सुरक्षा द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केली.

- Advertisement -

दरम्यान, ऑलिम्पिक आणि कॉमन वेल्थ स्पर्धेवर सोशल मीडियावर उघड भूमिका मांडणारे भारतातील स्टार क्रिकेटपटू आणि नामवंत खेळाडू कुस्ती महासंघातील लैंगिक शोषणावर गप्प का आहेत?, कोण काहीच का बोलत नाही, असा संतप्त सवाल विनेश फोगाटने केला आहे.

संपूर्ण देश क्रिकेटची पुजा करतो. असे असताना भारतीय कुस्ती महासंघात सुरु असलेल्या गैरप्रकाराबाबत कोणीही क्रिकेटपटू काहीच बोलत नाही. आमच्याच बाजूने बोला असं आमचं म्हणणं नाही. पण कोणत्याही खेळाडूवर अन्याय होऊ नये एवढा तर संदेश तुम्ही देऊ शकता. मला या गोष्टीचंच दुःख आहे की क्रिकेटर, बॅडमिंटनपटू, बॉक्सर किंवा अन्य खेळाडू याविषयी कोणीच काहीही बोलत नाही, अशी खंत विनेश फोगाटने बोलून दाखवली.

असं नाही की भारतीय खेळाडू भूमिका मांडण्यात मागे असतात. अमेरिकेतील एका आंदोलनाला भारतीय क्रिकेटर्संनी पाठिंबा दिला होता. मग आमच्या आंदोलनावर बोलण्यात अन्य खेळाडूंना काय अडचण आहे. आमच्या आंदोलनावर बोलू नका असं त्यांना कोणी सांगितलं आहे की ते व्यवस्थेला घाबरतात. आमच्या आंदोलनावर बोलणे कदाचित त्यांच्या प्रतिष्ठेला किंवा त्यांच्या ब्रॅंडला आवडणार नसेल म्हणून ते गप्प आहेत, असे प्रश्न फोगाटने उपस्थित केले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -