मराठीच्या नावाने शिवसेनेला टार्गेट करणाऱ्या भाजपचे ८२ पैकी ४४ नगरसेवक अमराठी

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शिवधनुष्यातून सोडला भाजपवर बाण

Standing Committee Chairman Yashwant Jadhav
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव

शिवसेना मराठी लोकांच्या हितासाठी स्थापनेपासूनच काम करीत आहे. मात्र असे असताना मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेनेला हिनवणाऱ्या भाजपचे मुंबई महापालिकेत ८२ पैकी ४४ नगरसेवक हे ‘अमराठी’ आहेत, अशी माहिती देत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, सेनेच्या शिवधनुष्याच्या माध्यमातून ‘ जहरी’ बाण सोडून जखमी केले आहे.

शिवसेना ही मराठी माणसाची व मराठी भाषेची गळचेपी करीत आहे, असा घणाघाती आरोप भाजपतर्फे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. शिवसेनेने कोकण कन्या शुभांगी सावंत यांची सेवाज्येष्ठता डावलून पालिका चिटणीसपदी संगीता शर्मा यांची नेमणूक नियमबाह्य नेमणूक केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे. तसेच, मुंबईतील पालिकेच्या मराठी शाळा एकामागोमाग एक बंद पडत असून मराठी विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे.शिवसेनेमुळे मराठीची गळचेपी होत असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला आहे. आज स्थायी समितीच्या बैठकीतही मराठी – अमराठी मुद्द्यावरून शिवसेना व भाजप यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, त्याची गंभीर दखल घेऊन भाजपला वरीलप्रमाणे सणसणीत उत्तर दिले आहे.

ज्या मराठीच्या मुद्द्यावरून भाजप थयथयाट करीत उठसूट शिवसेनेला टार्गेट करीत आहे, त्या भाजपचे मुंबईत ८२ पैकी ४४ नगरसेवक ‘अमराठी’ आहेत, त्या भाजपने मराठीबाबत मोठा कळवळा दाखवत शिवसेनेला मराठी भाषेबाबत धडे देऊ नयेत, असा टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपला लगावला आहे.

तसेच, मराठी चिटणीस पदाच्या नियुक्तीवरून खालच्या पातळीचे घाणेरडे राजकारण करू नये, असा इशाराही यशवंत जाधव यांनी भाजपला दिला आहे. तसेच, भाजपचे आरोप निराधार असून त्यांचे मराठी भाषेवरील प्रेमही बेगडी आहे, अशी टीका यशवंत जाधव यांनी भाजपवर केली आहे. पालिका चिटणीस पदाबाबत ‘मराठी – अमराठी’ असा कोणताही भेदभाव नसल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले.