सफाई कामगाराचा मुलगा आहे, राहणीमान सुधारण्यासाठी चांगलीच घरे देणार – यशवंत जाधव

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची स्पष्टोक्ती, भाजपचे आरोप केवळ राजकीय हेतूने

Yashwant Jadhav's first reaction on income tax raid Let's fight let's win
लढूया, जिंकूया, एकदिलाने भगवा फडकवूया, यशवंत जाधवांची आयकरच्या छापेमारीवर पहिली प्रतिक्रिया

मी सफाई कामगाराचा मुलगा आहे. माझी आई मुंबई महापालिकेत सफाई कामगार होती. घर काय असते, जीवन काय असते हे मी जवळून बघितले आहे. सफाई कर्मचार्‍यांची फसवणूक करणे हे माझ्या रक्तात नाही. त्यामुळे माझ्या कारकिर्दीत सफाई कामगारांचे राहणीमान सुधारण्यासाठी सर्वते करणार. मुंबई महापालिका निवडणूक काही महिन्यांवर आल्याने विरोधी पक्ष भाजप जे आरोप करतात ते केवळ राजकीय आहेत. त्यांना उत्तर द्यायला मी तयार आहे; पण माझ्या सफाई कामगारांसाठी चांगलीच घरे देणार, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत यांनी केले.

सफाई कामगारांना आरोग्यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, तरीही सफाई कामगार त्यांच्या आरोग्याची काळजी करत नाहीत आणि मुंबईला निरोगी ठेवण्यात आपले आयुष्य घालवतात. त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी शिवसेना पाठपुरावा करत आहे. कोणत्याही परिस्थितीत सफाई कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी शिवसेना आणि मुंबई महापालिका कटीबद्ध आहे, असेही जाधव म्हणाले.

महापालिका सफाई कामगारांच्या घरांमध्ये 1844 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला होता. त्याचा समाचार घेताना मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये 300 ते 600 चौरस फुटांची घरे बांधण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत आला आणि सर्वपक्षीय संमतीने मंजूर झाला तेव्हा भाजपचे नगरसेवक गप्प का होते. आता निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केवळ शेकडो, हजारो कोटींचे भ्रष्टाचार झाल्याचे बिनबुडाचे आरोप करण्याचा एककलमी कार्यक्रम पालिकेतील भाजपने सुरू केला आहे. मात्र, सफाई कामगाराचा मुलगा असल्याने चांगलीच घरे मुंबई महापालिकेकडून बांधली जातील. शहरात 1121, पश्चिम उपनगरात 1499 तर पूर्व उपनगरात 1386 अशी एकूण 4006 घरे बांधली जाणार असल्याने भाजपचा पोटशूळ आहे. सफाई कामगारांना न्याय मिळत असताना शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे ही घरे बांधली जात असल्यानेच भाजप बिनबुडाचे आरोप करत असल्याचेही जाधव म्हणाले.

सफाई काय कोणत्याही कामगारांची फसवणूक करणे शिवसेनेने आम्हाला शिकवले नाही. मुंबईचे गटार, नाले, रस्त्यांवरील कचरा उचलण्यात संपूर्ण आयुष्य गेलेल्या पालिकेच्या सफाई कामगारांच्या घरकुलाचे स्वप्न साकारण्याचा क्षण जवळ आल्यानेच भाजपची पायाखालची जमीन सरकल्याचा टोलाही यशवंत जाधव यांनी लगावला. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालिकेत एकूण 28 हजार सफाई कामगार असून 39 कर्मचारी वसाहती आहेत. तीस ते चाळीस वर्षे जुन्या असलेल्या या वसाहतींची सध्या दुरवस्था झाली आहे. अनेक वसाहती मोडकळीस आल्याने तेथील कर्मचार्‍यांच्या घरांसाठी पालिका घरकुल योजना राबवित आहे. मुंबई शहराच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. सफाई कामगारांना 300 चौरस फुटांची तर अधिकार्‍यांना 600 चौरस फुटांची घरे मिळणार आहेत.


हेही वाचा :  भाजपचा एकही नगरसेवक फुटणार नाही, भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदेंचे प्रत्युत्तर