घरमुंबईनववर्षाच्या पार्ट्यांवर येऊर पोलिसांची नजर

नववर्षाच्या पार्ट्यांवर येऊर पोलिसांची नजर

Subscribe

गर्दुल्ल्यांचा विळखा, अगोदरपासूनच अमली पदाथार्ंंचा साठा

नववर्ष स्वागताचे निमित्त साधत दरवर्षी ३१ डिसेंबरला येऊरच्या जंगल परिसरात पार्टी एन्जॉय करण्याचे फॅड सध्या ठाणे शहरातच नव्हे तर मुंबई आणि आसपासच्या परिसरातही वाढीस लागले आहे. याचा परिणाम येऊरच्या पर्यावरणावर होत असल्याने येऊरचा निसर्ग लुप्त होत चालला आहे. या परिसरात येऊन पार्ट्या करण्याचा कल वाढल्याने मागील काही वर्षात येऊरच्या परिसरात अनेक अपघात घडले आहेत. त्यावर उपाय म्हणून आता येथील पोलीस प्रशासनाने पार्ट्यांना बंदी केली आहे. त्यातच काही दिवसांपासून येऊरलगत असलेल्या उपवन परिसराला गर्दुर्ल्यांनी विळखा घातला आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या काही दिवस अगोदरच या ठिकाणी अमली पदार्थांचा साठा करण्यास सुरुवात झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. ठाण्यात अनेक मोठ्या गृहसंकुलामधून थर्टी फर्स्टनिमित्त पार्ट्या आयोजित करण्यात येतात. मात्र, या पार्ट्यांमध्ये अनेकवेळा अनुचित प्रकार घडल्याचे समोरे आले आहे. काही ठिकाणी सर्रासपणे अमली पदार्थाचाही वापर केला जातो. या शिवाय महसूल विभागाची नजर चुकवून अनेक हॉटेल्समध्ये बनावट दारूविक्री होते. यावर उपाय म्हणून येऊर येथील बंगलाधारक तसेत हॉटेल मालकांना लाऊड स्पीकर, डीजे लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. अवैध पद्धतीने होणारी मद्यविक्री आणि डीजे पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय या परिसरातील बंगले भाड्याने देण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. साधारण ७५ बंगलेधारक आणि हॉटेल चालकांसह सुमारे २५८ जणांना याबाबत नोटीस देण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असे बजावण्यात आले आहे. तसेच हॉटेल चालकांनी मद्यसेवन केलेल्या त्यांच्या कस्टमर्सना ड्रायव्हर देऊन घरी सुरक्षित सोडण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या बंगलेधारक आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

- Advertisement -

दारू पिऊन वाहन चालवणे, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर गोंधळ घालणे, छेडछाड करणे यास प्रतिबंध व्हावा म्हणून येऊर तसेच उपवन तलाव परिसरात नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. येऊर परिसरात रस्त्यावर कारचा डेक स्पीकर लावून गोंधळ घालणार्‍यांवर प्रतिबंध व्हावा म्हणून सक्त मोटरसायकल, व्हॅन पेट्रोलिंग ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी या वेळेस उत्पादन शुल्क विभाग आणि वन विभागासोबात एकत्रपणे हुल्लडबाजी करणार्‍यांना चाप देण्यासाठी पूर्वतयारी केलेली आहे. दारू पिऊन गाडी चालवणार्‍या चालकांविरोधात मोठी कारवाई केली जाणार आहे. यासाठी विविध ठिकाणी नाकाबंदी आणि पेट्रोलिंग वाहनांमध्ये चेकिंगसाठी मशिन ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

सायलेन्स झोन परिसर
येऊरच्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने हा परिसर सायलेन्स झोन (शांताता क्षेत्र) घोषित करण्यात आला आहे. तर, तलावामुळे उपवन परिसरही पार्ट्यांसाठी हॉट डेस्टिनेशन बनले आहे. त्यामुळे या परिसरात थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून या परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्याने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत वनविभाग, स्थानिक पोलिसांसोबत आम्हीही खंबीर भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे आम्ही लक्ष ठेऊन आहोत.
– नरेंद्र सुरकर, स्थानिक नगरसेक

- Advertisement -

उपवन परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर वाढला असला तरी मागील महिन्याभरात तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा परिसर शांतता क्षेत्र असल्याने डीजे आणि स्पिकरला बंदी घालण्यात आली असून गैरप्रकार करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. काही अधिकृत हॉटेल वगळता अनेकांनी या कालावधीत हॉटेल्स तसेच बंगले बंदच ठेवणार असल्याचे सांगितले असले तरी, पार्ट्यांमधील गैरप्रकार समोर आल्यास आयोजकांसह बंगलेधारकांवरही कारवाई केली जाईल.
– टी. सी. गिरधर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तक नगर पोलीस ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -