घरमुंबईवाझे-हिरेन यांचा सीडीआर रिपोर्ट बाहेर आलाच कसा?

वाझे-हिरेन यांचा सीडीआर रिपोर्ट बाहेर आलाच कसा?

Subscribe

फडणवीसांकडील माहितीची गंभीर दखल

रिलायन्स उद्योगाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या पेडररोड इथल्या ‘अ‍ॅन्टिलिया’समोर संशयास्पदरित्या सापडलेल्या स्फोटक वाहनाचे प्रकरण आता कमालीचे संशयात गुरफटले आहे. गुप्तवार्ता विभागाचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर भाजप नेत्यांचा रोख आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना यातील अनेक दुवे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचत असल्याची बाब समोर आली आहे.

सचिन वाझे आणि ज्या स्कॉर्पिओत जिलेटीन सापडल्या त्या वाहनाचा दावाकर्ता मनसुख हिरेन यांच्यातील सीडीआर रिपोर्ट फडणवीस यांच्या हाती कसा लागला, याचा तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील अनेक पोलीस अधिकारी तपासांतर्गत बातम्या विरोधकांना पोहोचवत असल्याची जोरदार चर्चा शुक्रवारी विधानभवनात होती. यामुळे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न पोलीस दलातील काही अधिकार्‍यांकडून होत असल्याचेही पुन्हा स्पष्ट झाले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबरच आघाडी सरकारसाठीच ही गंभीर बाब समजली जात आहे.

- Advertisement -

राज्य विधानसभेत शुक्रवारी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर नियम २९३ अन्वये राज्य विधानसभेत चर्चा सुरू होती. या चर्चेवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख भाषण झाले. या भाषणात त्यांनी मुकेश अंबानी यांना आलेल्या धमक्या आणि त्यांच्या ‘अ‍ॅन्टिलिया’समोर जिलेटीनसह पार्क करण्या त आलेल्या स्कॉर्पिओचा विषय आवर्जून उपस्थित केला. हिरेन याच्या जिवाला धोका असल्याचे फडणवीस एकीकडे सांगत असताना दुसरीकडे सकाळीच त्यांचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडला. हा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत असल्याची बाबही माहितीचा अपलाप करणारी होती, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे ज्या स्कॉर्पिओचा वापर जिलेटीन ठेवण्यासाठी करण्यात आला ते वाहन हिरेन याने विकत घेतल्याचे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. यासाठीचे कागदपत्रेही पोलिसांच्या आधीच फडणवीसांच्या हाती लागले. इतकेच काय हिरेन याच्या जबानीचे कागदही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याआधी फडणवीसांच्या हाती लागल्याची एकच चर्चा सुरू होती.

यावेळी त्यांनी या प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी आणि गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे तपास अधिकारी नसताना ते घटनास्थळी सर्वात आधी कसे पोहोचले, याची माहिती फडणवीसांना मिळाली की नेहमीप्रमाणे त्यांनी फेकाफेक केली, याचीही माहिती घेतली जात आहे. कारण हा तपास क्राईम ब्रान्चचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन अलंकुरे यांच्याकडे होता. फडणवीस यांनी वाझे आणि स्कॉर्पिओ गाडीचा दावेकरी मनसुख हिरेन यांच्यातील जो सीडीआर रिपोर्ट सभागृहात ऐकवला. तो त्यांच्याकडे आला कुठून, या प्रश्नाने सार्‍या पोलीस दलाची झोप उडाली आहे. अशा गंभीर प्रकरणातील सीडीआर रिपोर्ट संबंधित चौकशी अधिकार्‍याकडे केवळ विभागीय उपायुक्तांच्या संमतीनेच दिला जातो.

- Advertisement -

प्रकरणाचा तपास सुरू होण्याआधीच हा सीडीआर फडणवीस यांना मिळाल्याने पोलीस दलातील गंभीर बाबींची गुप्तता कशी राहील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा रिपोर्ट फडणवीस यांना पोलिसांकडून प्राप्त झाला नसेल तर असे संभाषण कुठून मिळाले याची खातरजमा करण्याची शक्यता एका पोलीस अधिकार्‍याने या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. पर्यायी यंत्रणेचा वापर भाजपकडून केला जात असल्याची चर्चा अनेकदा केली जाते. यातही असेच झाले काय, अशी चर्चा सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -